विकासकामांसाठी कृती आराखडा करण्याबाबत चर्चा होणार
प्रतिनिधी /बेळगाव
कॅन्टोन्मेट बोर्डची सर्वसाधारण सभा सोमवार दि. 31 रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आली आहे. कॅन्टोन्मेंट बैठकीच्या विषयपत्रिकेवर 6 मुख्य विषय घेण्यात आले असून एसएफसी अनुदान आणि सीएफसी अनुदानांतर्गत विकासकामे राबविण्यासाठी कृती आराखडा करण्याबाबत चर्चा करण्यात येणार आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्डला राज्य शासनाकडून विविध अनुदानातून निधी मंजूर झाला आहे. एकूण 1 कोटी 18 लाख रुपये अनुदान मंजूर झाले असून याबाबतचे पत्र कॅन्टोन्मेंट बोर्डला देण्यात आले आहे. तसेच निधीचा विनियोग करण्यासाठी कृतीआराखडा तयार करण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे याबाबत चर्चा करण्यासाठी हा विषय बैठकीच्या अजेंडय़ावर घेण्यात आला आहे.
निविदांची फेरतपासणी करून कंत्राटदार निश्चित करणार
कॅन्टोन्मेंट बोर्डच्या मालमत्तांची देखभाल आणि दुरूस्तीसाठी निविदा काढण्यात आल्या होत्या. यामध्ये विविध कंत्राटदारांनी सहभाग घेतला असून कंत्राटदारांनी दिलेल्या निविदेवर चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच घरोघरी जाऊन कचरा जमा करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यामुळे काही स्वच्छता कंत्राटदारांनी निविदा प्रक्रियेत सहभाग घेऊन आपले दर सादर केले आहेत. निविदांची फेरतपासणी करून कंत्राटदार निश्चित करण्यात येणार आहेत.
रेल्वेस्थानकासमोर निर्माण करण्यात आलेल्या कारवार बसस्थानकाचे हस्तांतर कॅन्टोन्मेंटकडे करण्यात येणार आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डच्या बैठकीत चर्चा करून हस्तांतर करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र हा विषय कॅन्टोन्मेंटच्या बैठकीच्या अजेंडय़ावर घेण्यात आला नाही. त्यामुळे कारवार बसस्थानकाचे हस्तांतर होणार की पुन्हा लांबणीवर जाणार याकडे लक्ष लागले आहे.