विद्यमान सदस्यांना आणखी सहा महिन्यांची मिळणार मुदतवाढ
प्रतिनिधी/ बेळगाव
कॅन्टोन्मेंट बोर्डची मुदत संपत आल्याने निवडणुकीच्या घोषणेकडे नागरिकांचे लक्ष लागले होते. मात्र, कॅन्टोन्मेंट बोर्डच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडणार असून विद्यमान सदस्यांना आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ मिळणार आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डच्या निवडणुका सहा महिने पुढे ढकलण्यात आली असल्याची घोषणा केली आहे.
देशातील 55 कॅन्टोन्मेंट बोर्डच्या लोकनियुक्त सभागृहाची मुदत फेब्रुवारीला संपणार असल्याने आवश्यक तयारी करण्याची सूचना कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाला संरक्षक मंत्रालयाने केली होती. यानुसार कॅन्टोन्मेंट बोर्डने महिलांसाठी राखीव वॉर्ड तसेच मागासवर्गीयांसाठी राखीव वॉर्ड असे विविध सोपस्कार कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने पूर्ण केले होते. यामुळे निवडणूक तारखेच्या घोषणेकडे नागरिकांचे लक्ष लागले होते. पण यावर संरक्षण खात्याने पाणी फेरले असून सध्या निवडणुका घेण्यास नकारात्मक भूमिका दर्शविली आहे.
सप्टेंबर महिन्यात निवडणुका घेण्याचे विचाराधीन
देशातील 55 कॅन्टोन्मेंट बोर्डची मुदत फेब्रुवारीला संपणार आहे. मात्र, कॅन्टोन्मेंट बोर्डला 6 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. सप्टेंबर महिन्यात निवडणुका घेण्याचे विचाराधीन आहे. मंत्रालयाच्या निर्णयामुळे विद्यमान सदस्यांना आणखी 6 महिन्यांचा कालावधी मिळणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. यापूर्वी सहा महिने कार्य कालावधी वाढवून मिळाला होता. आता पुन्हा सहा महिन्यांचा कालावधी मिळणार असल्याने विद्यमान सदस्यांचा कार्य कालावधी साडेपाच वर्षांचा होणार आहे.