महिन्याभरात 3 हजार 472 बाहय़ रुग्णांवर उपचार : परिसरातील रहिवाशांसाठी वैद्यकीय सुविधांसह विविध नागरी सुविधा उपलब्ध
प्रतिनिधी /बेळगाव
कॅन्टोन्मेंट बोर्डच्यावतीने लष्करी छावणीतील परिसरात नागरी सुविधा पुरविल्या जातात. त्याचप्रमाणे परिसरातील रहिवाशांच्या मुलांसाठी शैक्षणिक सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच आरोग्याच्या दृष्टीने वैद्यकीय सुविधादेखील उपलब्ध असून, मागील महिन्याभराच्या कालावधीत 3 हजार 472 बाहय़ रुग्णांची तपासणी करून उपचार करण्यात आले. त्यामुळे वैद्यकीय सुविधा कॅन्टोन्मेंटवासियांसाठी सोयीची ठरत आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्डची स्थापना 1828 मध्ये इंग्रजांच्या कालावधीत झाली होती. इंग्रजांच्या सैन्य दलाची छावणी व सैन्याला प्रशिक्षण देण्यासाठी हे कार्यालय सुरू करण्यात आले होते. या छावणीत प्रशिक्षण घेणाऱया जवानांसह अधिकाऱयांना नागरी सुविधा पुरविण्यासाठी विविध बाजारपेठांची निर्मिती करण्यात आली होती. त्यामुळेच या परिसरातील रस्त्यांची नावे व्यवसायानुसार आहेत. कॅन्टोन्मेंट बोर्डचे कार्यालय सुरू करून नागरी सुविधा पुरविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कॅन्टोन्मेंट छावणीचा वापर भारतीय सैन्य दलाला प्रशिक्षण देण्यासाठी केला जातो. त्यामुळे बेळगाव कॅन्टोन्मेंट परिसरात असलेल्या छावणीमध्ये हजारो जवानांना प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षणासाठी असलेल्या अधिकाऱयांसाठी वसतिगृहे निर्माण केली आहेत. वसतिगृह आणि प्रशिक्षण छावणीच्या परिसरात नागरी सुविधा पुरविण्याची जबाबदारी कॅन्टोन्मेंट बोर्डची आहे.
10 खाटांचे रुग्णालय कार्यरत
इंग्रज गेल्यानंतर त्यांचे बंगले स्थानिक नागरिकांकडे हस्तांतरण झाले. तसेच काही सिव्हिलियन नागरिकांची वसाहत कॅन्टोन्मेंट परिसरात निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांना आवश्यक असलेल्या सुविधा पुरविण्याचे काम कॅन्टोन्मेंट करते. पाणी, स्वच्छता, रस्त्यांचा विकास, आरोग्य सुविधा अशा विविध नागरी सुविधा कॅन्टोन्मेंट बोर्डकडून उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तसेच कॅन्टोन्मेंट परिसरातील रहिवाशांच्या मुलांसाठी मराठी, कन्नड, इंग्रजी आणि उर्दू अशा चारही माध्यमाच्या शाळा कॅन्टोन्मेंट बोर्डकडून चालविल्या जातात. याकरिता राज्य शासनाकडून कोणतेच अनुदान दिले जात नाही. त्याचप्रमाणे कॅन्टोन्मेंट परिसरातील रहिवाशांसाठी वैद्यकीय सुविधा देखील उपलब्ध करण्यात आल्या आहेत. कॅन्टोन्मेंट कार्यालयाशेजारी असलेल्या इमारतीमध्ये 10 खाटांचे रुग्णालय कार्यरत आहे.
दर महिन्याला 3 ते 4 हजार रुग्ण
या रुग्णालयात कॅन्टोन्मेंटसह शहर परिसरातील बाहय़ रुग्ण देखील उपचारासाठी येत असतात. प्रत्येक महिन्याला 3 ते 4 हजार रुग्ण उपचार घेतात. तसेच रक्त चाचणी, एक्सरे आणि विविध प्रकारचे लसीकरण तसेच आरोग्य विषयक चाचण्या केल्या जातात. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात येते. सप्टेंबर महिन्याभरात 3 हजार 472 बाहय़ रुग्णांवर उपचार करण्यात आले. तसेच 19 रुग्णांचे एक्सरे काढण्यात आले. तर 5 रुग्णांवर साध्या प्रकारची शस्त्रक्रिया करण्यात आली. सोनोग्राफी सुविधा उपलब्ध असल्याने याचा उपयोगदेखील नागरिकांना होत असून, महिन्याभरात 8 रुग्णांची सोनोग्राफी करण्यात आली. रुग्णालयात बाहय़ रुग्णांवर उपचार केले जातात. रुग्णांसाठी विविध चाचण्या करण्यासाठी पॅथॉलॉजी लॅबची सोय करण्यात आली आहे. या लॅबमध्ये सप्टेंबर महिन्यात 303 चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये 80 रुग्णांची संपूर्ण रक्त चाचणी करण्यात आली आहे. युरिन रुटीन चेकअपचा लाभ 62 रुग्णांनी घेतला असून 62 रुग्णांनी हेमॅटॉलॉजी तपासणी करून घेतली आहे. अशा प्रकारे विविध चाचण्या करून घेण्यात येत आहेत. त्यामुळे हे रुग्णालय रुग्णांसाठी सोयीचे ठरत आहे.
अत्याधुनिक यंत्रोपकरणांसह सुविधा देण्याची गरज
शहराच्या मध्यवर्ती भागात हे रूग्णालय असल्याने राज्य शासनाच्या वतीने या ठिकाणी नगर आरोग्य केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. त्या दृष्टीने जिल्हा आरोग्य अधिकाऱयांनी रूग्णालयाची पाहणी केली होती. मात्र याबाबत कोणतीच कारवाई झाली नाही. सदर रूग्णालय कॅन्टोन्मेंटमधील रहिवाशांसह शहरवासीयांसाठी सोयीचे असल्याने नगर आरोग्य केंद्र सुरू करण्याची आवश्यकता आहे. तसेच रूग्णालयाचा दर्जा वाढविण्याच्या दृष्टीने अत्याधुनिक यंत्रोपकरणे उपलब्ध करून सुविधा देण्याची गरज आहे.