कॅन्टोन्मेंट अध्यक्ष ब्रिगेडिअर रोहित चौधरी यांनी दिली माहिती : बैठकीत आमदार-खासदारांचा सहभाग : विषयांवर चर्चा
प्रतिनिधी / बेळगाव
शहरात लॉकडाऊन करण्यात आल्याने संपूर्ण कार्यालयाचे कामकाज ठप्प झाले असल्याने बैठका होत नाहीत. मात्र कॅन्टोन्मेंट बोर्डच्या कारभाराबाबत चर्चा करून विविध विषयांवरील निर्णय घेण्यासाठी ऑनलाईन बैठक घेण्यात आली. तसेच कॅन्टोन्मेंटमधील बंद ठेवण्यात आलेले रस्ते खुले करण्याबाबत चर्चा करण्यात आली असता सकाळी 6 ते रात्री 8 वाजेपर्यंत रस्ते खुले असतील, अशी माहिती ब्रिगेडिअर रोहित चौधरी यांनी दिली.
कॅन्टोन्मेंट बोर्डची बैठक पहिल्यांदाच ऑनलाईन आयोजित करण्यात आली होती. कॅन्टोन्मेंट बोर्डचे अध्यक्ष ब्रिगेडिअर रोहित चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या ऑनलाईन सभेला नवनिर्वाचित खासदार मंगला अंगडी यांच्यासह आमदार अनिल बेनके उपस्थित होते. बैठकीच्या विषयपत्रिकेवर विविध विषय घेण्यात आले होते. प्रामुख्याने रस्त्यांच्या विकासाबाबतचा मुद्दा तसेच कॅन्टोन्मेंटमधील रस्ते खुले करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
कॅन्टोन्मेंट हद्दीतील काही रस्ते लष्कराने बंद केले आहेत. अल्बर्ट एक्का रोड आणि गणेशपूर ते अरगन तलावपर्यंतचा रस्ता नागरिकांना सोयीचा आहे. त्यामुळे हे रस्ते खुले करण्यात यावेत, अशी मागणी नागरिकांनी केली होती. याबाबत खासदार मंगला अंगडी व विधान परिषद सदस्य इराण्णा कडाडी यांनी रस्ते खुले करण्यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डला पत्र दिले होते. तसेच हा विषय बैठकीच्या अजेंडय़ावर घेण्यात आला होता. त्यामुळे बैठकीत याबाबत चर्चा करण्यात आली. सदर रस्ते का बंद ठेवण्यात आले आहेत? असा मुद्दा आमदार अनिल बेनके यांनी उपस्थित केला. हे रस्ते बंद ठेवण्यात आले असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. तसेच नागरिकांसाठी रस्ते खुले करण्याची सूचना संरक्षण खात्याने केली असता, रस्ते बंद का केले आहेत, अशी विचारणा ऑनलाईन बैठकीवेळी केली. कॅन्टोन्मेट बोर्ड हद्दीतील रस्ते खुले ठेवण्यात आले आहेत, पण कॅन्टोन्मेट हद्दीतील रस्त्यावरून ये-जा करताना हेल्मेट वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच नागरिकांसाठी हे रस्ते सकाळी 6 ते रात्री आठ वाजेपर्यंत खुले ठेवण्यात आले आहेत, अशी माहिती ब्रिगेडिअर रोहित चौधरी यांनी दिली. यावेळी कॅन्टोन्मेंट बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. बर्चस्वा, कॅन्टोन्मेंट बोर्डचे अधिकारी ऑनलाईन बैठकीत सहभागी झाले होते.
संरक्षण खात्याच्या परवानगीनंतरच रस्ताकाम…
स्मार्टसिटी योजनेअंतर्गत रस्त्याचा विकास करण्यात येत आहे. पण काही रस्त्याच्या विकासाकरिता कॅन्टोन्मेंट बोर्डकडून परवानगी देण्यात आली नाही. तसेच अरगन तलाव चौक ते मिलीटरी विनायक मंदिरपर्यंतच्या रस्ता रूंदीकरणाचा प्रस्ताव आहे. त्यामुळे याकामासाठी मंजुरी देण्यात यावी, अशी सूचना आमदार अनिल बेनके यांनी केली. रस्त्याचा विकास करण्यासाठी स्मार्ट रोडचा प्रस्ताव सरंक्षण खात्याकडे पाठविण्यात आला आहे. याबाबत संरक्षण खात्याने अद्याप कोणताच निर्णय घेतला नाही. रस्ता करण्याकरिता ना हरकत दाखला दिल्यानंतर विकासकामे राबविण्यास परवानगी देण्यात येईल, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.