कॅम्पमधील 102 पैकी आतापर्यंत 52 खांब बदलण्याचे काम पूर्ण
प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील धोकादायक वीजखांब बदलण्याची मोहीम हेस्कॉमकडून हाती घेण्यात आली आहे. कॅम्प व किल्ला येथील जुने लोखंडी खांब बदलण्यात आले आहेत. शुक्रवारी आमदार अनिल बेनके यांनी कॅम्प येथे कामाची पाहणी केली. याचप्रमाणे शहराच्या इतर भागातील धोकादायक खांब बदली करावेत, अशी सूचना आमदार बेनके यांनी हेस्कॉम अधिकाऱयांना केली आहे.
कॅम्प येथे एकूण 102 विद्युतखांब बदलले जाणार आहेत. यापैकी आतापर्यंत 52 खांब बदलण्याचे काम पूर्ण झाले असून उर्वरित विद्युतखांब 4 दिवसांमध्ये बदलले जाणार आहेत. धोकादायक खांबांमुळे रहिवाशांना धोका वाढला होता. त्यामुळे ते बदलावेत, अशी मागणी नागरिकांमधून होत होती. हेस्कॉमचे साहाय्यक कार्यकारी अभियंते अरविंद गदगकर यांनी हे विद्युतखांब बदलण्यास सुरुवात केली आहे. या कामाची पाहणी करून आमदारांनी समाधान व्यक्त केले. यापुढील काळात चव्हाट गल्ली, भडकल गल्ली या परिसरातील जुने विद्युतखांब बदलले जाणार असल्याची माहिती यावेळी हेस्कॉमकडून देण्यात आली.