वृत्तसंस्था/ लंडन
माजी अग्रमानांकित कॅरोलिना प्लिस्कोव्हाला पाच वर्षांत प्रथमच डब्ल्यूटीए मानांकनात टॉप टेनमधून बाहेर पडावे लागणार आहे. येथे सुरू झालेल्या ईस्टबोर्न महिला टेनिस स्पर्धेत तिला कॅमिला जॉर्जीकडून पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसल्याने या स्पर्धेचे जेतेपद स्वतःकडेच राखण्यात ती अपयशी ठरली आहे.
झेकच्या प्लिस्कोव्हाला येथे पाचवे मानांकन मिळाले होते. इटलीच्या कॅमिला जॉर्जीने तिला 2-6, 6-2, 6-2 असे नमवित तिचे आव्हान संपुष्टात आणले. विम्बल्डनच्या तयारीच्या दृष्टीने ही वार्मअप स्पर्धा मानली जाते. प्रेंच ओपन स्पर्धेची अंतिम फेरी गाठलेल्या ऍनास्तेशिया पावल्युचेन्कोव्हालाही पराभवाचा धक्का बसला असून तिला लॅटव्हियाच्या एलेना ओस्टापेन्कोने 6-1, 6-3 असे हरवित दुसरी फेरी गाठली. अन्य सामन्यात द्वितीय मानांकित एलिना स्विटोलिनाने पॉला बडोसावर 4-6, 6-1, 7-6 (7-1) अशी संघर्षपूर्ण मात केली. तिसऱया मानांकित बियान्का अँड्रेस्क्यूने 2018 नंतर ग्रास कोर्टवर पहिला विजय मिळविताना ख्रिस्तिना मॅकहेलवर 6-4, 2-6, 6-2 अशी मात करीत आगेकूच केली. ब्रिटनच्या हॅरियट डार्टला मात्र कझाकच्या एलेना रीबाकिनाकडून 6-2, 6-7 (5-7), 6-4 असा पराभव स्वीकारावा लागला.