वृत्तसंस्था/ माद्रीद (स्पेन)
रविवारी येथे झालेल्या युरोपियन चॅम्पियन्सशीप आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत स्पेनच्या कॅरोलिना मॅरीनने महिला विभागातील जेतेपद तर व्हिक्टर ऍक्सलसनने पुरूष विभागातील अजिंक्यपद पटकाविले. मॅरीनचे युरोपयिन बॅडमिंटन स्पर्धेचे हे सहावे विजेतेपद आहे.
महिला एकेरीच्या झालेल्या अंतिम सामन्यात स्पेनच्या मॅरीनने स्कॉटलंडच्या किरस्टी गिलमोरचा 21-10, 21-12 अशा गेम्समध्ये केवळ 41 मिनिटात पराभव करत या स्पर्धेचे एकूण सहाव्यांदा तर सलग पाचव्यांदा अजिंक्यपद पटकाविले.
मॅरीनला यापूर्वी डाव्या गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे गेल्यावर्षी ती टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी झाली नव्हती. या प्रतिष्ठेच्या बॅडमिंटन स्पर्धेत यापूर्वी डेन्मार्कच्या पीटर गेडने एकेरीची सर्वाधिक अजिंक्यपदे (सात) मिळवेले असून या विक्रमांशी बरोबरी साधण्याकरिता मॅरीनला आणखी केवळ एका विजेतेपदाची जरूरी आहे. या स्पर्धेत यापूर्वी स्पेनच्या टीने बॉनने महिला एकेरीचे जेतेपद मिळविले होते.
स्पेनच्या व्हिक्टर ऍक्सलसनने रविवारी पुरूष एकेरीचे जेतेपद पटकाविताना आपल्या प्रतिस्पर्ध्यांचा अंतिम सामन्यात 21-17, 21-15 असा पराभव केला. ऍक्सलसनने गेल्या चार वर्षांच्या कालावधीत हे तिसरे पुरूष एकेरीचे अजिंक्यपद पटकाविले आहे. युरोपियन चॅम्पियन्सशीप स्पर्धेत स्टोएव्हा भगिनीनी महिला दुहेरीचे अजिंक्यपद तिसऱयांदा पटकाविताना इफेर आणि लोयु यांचा 21-14, 21-10, जर्मनीच्या लेम्सफस आणि लोयु यांनी मिश्र दुहेरीचे अजिंक्यपद पटकाविताना फ्रान्सच्या गिक्वेल आणि डिलेरू यांचा 16-21, 22-20, 21-16 असा पराभव केला. जर्मनीचा लेम्सफस आणि सिडेल यांनी पुरूष दुहेरीचे अजिंक्यपद पटकाविताना स्कॉटलंडच्या डन आणि हॉल यांचा 21-17, 21-16 असा पराभव केला.