कॅल्शियम हा शरीरासाठी अत्यंत आवश्यक असा घटक आहे. हा घटक आपल्या हाडांना बळकटी प्रदान करतो आणि दीर्घकाळापर्यंत निरोगी राहण्यासही मदत करतो. अर्थात, केवळ कॅल्शियमचे सेवन करणेच पुरेसे नाही. त्याबरोबरच कॅल्शियमचे शोषण (ऍब्सॉर्बशन) आपल्या शरीरात योग्य प्रकारे होत आहे की नाही, याकडेही आपल्याला लक्ष द्यावे लागते.
- वास्तविक, असे अनेक पोषक घटक आहेत, जे कॅल्शियमसोबत सेवन केल्यास शरीरात कॅल्शियमचे शोषण पुरेशा प्रमाणात होत नाही. त्यामुळे कॅल्शियमच्या सोबत कोणत्या घटकांचे सेवन करू नये, हे जाणून घेणे उचित ठरेल.
- कॅल्शियमसोबत लोहयुक्त पदार्थांचे सेवन करणे कदापि चांगले मानले जात नाही. वास्तविक, ज्यावेळी आपण कॅल्शियमने परिपूर्ण पदार्थांबरोबर लोहाची मात्रा भरपूर असलेले पदार्थ सेवन करतो किंवा कॅल्शियम आणि आयर्न सप्लिमेन्ट्स एकाच वेळी सेवन करतो तेव्हा शरीरात कॅल्शियम शोषून घेण्याच्या प्रक्रियेत अडथळे येतात. त्यामुळे कॅल्शियमयुक्त पदार्थांचे सेवन केल्यानंतर सुमारे तासाभरानेच आयर्नयुक्त पदार्थांचे सेवन करावे.
- हाय फायबर फूड म्हणजे फायबरचे प्रमाण अधिक असलेले अन्नपदार्थ शरीरासाठी अत्यंत उपयुक्त मानले जातात. परंतु त्यात फायटेट्स असतात हेही तितकेच खरे आहे. हे फायटेट्स शरीरात कॅल्शियमचे शोषण होण्याच्या प्रक्रियेत अडथळा आणतात, हे बर्याच जणांना ठाऊक नसते.
- कॅल्शियमयुक्त पदार्थांसोबत चहा किंवा कॉफी घेणे आपल्याला टाळले पाहिजे. वास्तविक त्यात कॅफेन असते आणि त्यामुळे शरीरात कॅल्शियमचे शोषण होण्यात अडथळे निर्माण होतात. कॉफी, चहा आणि सोडय़ामध्ये असलेले कॅफेन हे एक हलके डायरूटिक म्हणूनही काम करते. त्यामुळे याचे सेवन केल्यास कॅल्शियम शरीरातून बाहेर निघून जाते.
- ज्या पदार्थांमध्ये ऑक्सालेट्सचे प्रमाण अधिक असते, असे पालकसारखे पदार्थ आपण अधिक प्रमाणात सेवन करीत असाल तर त्यामुळेही शरीरात कॅल्शियमचे शोषण योग्य प्रमाणात होऊ शकत नाही. ऑक्सालेट्स अधिक प्रमाणात असलेल्या पदार्थांमध्ये बीट, रताळे आणि अन्य काही पदार्थांचा समावेश होतो. या पदार्थांमध्ये अन्य आरोग्यवर्धक, पोषक घटक असतात. परंतु या पदार्थांसोबत कॅल्शियम घेणे हितावह ठरत नाही.