प्रतिनिधी/ पणजी
कॅसिनोंची क्षमता कमी दाखवून ते परवाना फी कमी देतात आणि ती बुडवतात म्हणून त्यांची तपासणी करण्यासाठी सरकारने समिती नेमली असून ती आता नोटिसा देवून कॅसिनोंची पाहणी करणार आहे. गृह खात्याचे सचिव हे त्या समितीचे अध्यक्ष आहेत. विविध खात्यांच्या सदस्यांना समितीत सामाविष्ठ करण्यात आले आहे.
गोव्यात ऑफ शोअर – ऑन शोअर असे दोन प्रकारचे कॅसिनो असून ते क्षमता कमी दाखवतात आणि परवाना फी बुडवतात तसेच सरकारला चुना लावतात. परिणामी सरकारचा महसूल बुडतो अशा तक्रारी आल्यामुळे त्याची खातरजमा करण्यासाठी ही समिती नेमली आहे. ती आता कॅसिनो बोटींची तपासणीत पाहणी करणार आहे, तत्पूर्वी त्यांना नोटिसा देण्यात येणार आहेत.
एकूण 3 कॅसिनोंनी क्षमता कमी दाखवून परवाना फी कमी दिल्याचे प्रकरण समोर आले आहे. त्याची गंभीर दखल सरकारने घेतली असून सोक्षमोक्ष लावण्यासाठी हे समितीचे पाऊल उचलले आहे. ज्या कॅसिनोंनी परवाना फी बुडविली आहे त्यांच्याकडून ती वसुल करण्यात येणार आहे, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली. ती बुडवल्यामुळे सरकारी तिजोरीला लाखो रुपयांचा फटका बसला आहे.