पणजी / प्रतिनिधी
मांडवी नदीत तरंगत्या कॅसिनोंच्या व्यापार परवान्यांच्या नूतनीकरणाचा मार्ग मोकळा झाला असून बुधवारी मनपाच्या झालेल्या बैठकीत व्यापार परवान्यांच्या नूतनीकरणाला मंजूरी देण्यात आली आहे. कॅसिनोंच्या व्यापार परवान्यांच्या नूतनीकरणावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. नूतनीकरण करताना त्यांना काही अटी व शुल्क वाढविण्यात आले आहे. ठरविलेल्या मापातच त्यांना साईनबोर्ड घालावे लागणार असल्याची माहिती महापौर उदय मडकईकर यांनी दिली.
कॅसिनोंचे कर्मचारी कॅसिनो परिसरात अस्ताव्यस्तपणे वाहने पार्किंग करतात त्याचा स्थानिक व वाहनचालकांना त्रास होतो. अशाप्रकारच्या गोष्टींवर आळा घालण्यासाठी दंड आकारला जाणार आहे. अस्ताव्यस्त पार्किंग करणाऱयांवर 1500 रूपये दंड आकारण्यात येणार आहे. तसेच ना पार्किंगमध्ये वाहने पार्क करणाऱया सामान्यांना दुचाकीसाठी 600 रूपये तर चारचाकीसाठी 800 रूपये दंड आकारला जाणार आहे.
कॅसिनो कर्मचाऱयांनी आपली वाहने पाटो प्लाझा किंवा पणजी मार्केट परिसरातील रॉयल फूड परिसरात उभी करावीत. पणजीवासियांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय घरपट्टीवरही बैठकीत चर्चा करण्यात आली. तसेच या बैठकीत खाद्यपदार्थांच्या गाडय़ांच्या परवाना नूतनीकरणाविषयी चर्चा करण्यात आली नसून पुढील बैठकीत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती मडकईकर यांनी दिली