ऑनलाईन टीम / हवाना :
फिडेल कॅस्ट्रो यांचे बंधू राऊल कॅस्ट्रो यांनी कम्युनिस्ट पार्टीचे अध्यक्षपद सोडण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे क्युबात तब्बल 60 वर्षांनी कॅस्ट्रो घराण्याचा राजकीय झंझावात विसावणार आहे. भविष्यात क्युबाला मार्गदर्शन करण्यासाठी कॅस्ट्रो घराण्यातील कोणतीही व्यक्ती नसणार आहे.
89 वर्षीय राऊल कॅस्ट्रो यांनी एका परिषदेत पक्षाचे अध्यक्षपद सोडण्याची घोषणा केली आहे. राऊल हे 2008 मध्ये फिडेल कॅस्ट्रो यांच्या आरोग्याच्या तक्रारीमुळे सत्तेत आले होते. तेव्हा फिडेल यांनीच राऊल यांच्याकडे पक्षाचे अध्यक्षपद सोपविले होते. राऊल अध्यक्षपदावरुन पायउतार झाल्यानंतर मिग्युएल डियाझ कॅनेल (वय 60) यांच्याकडे हे पद जाण्याची शक्यता आहे. कॅनेल हे 2013 पासून क्युबाचे उपाध्यक्ष असून ते कॅस्ट्रो कुटुंबाबाहेरील तसेच क्युबामधील 1959 च्या क्रांतीनंतर जन्माला आलेल्या पिढीमधील पहिले राष्ट्राध्यक्ष ठरणार आहेत.
दरम्यान, कोरोना महामारी, ट्रम्प यांनी लादलेल्या आर्थिक निर्बंधांमुळे क्युबाच्या अर्थव्यवस्थेचे झालेले नुकसान, त्यातच राऊल यांची सत्तेतून पायउतार होण्याची घोषणा यामुळे क्युबाची चिंता वाढली आहे.