माजी मंत्री रमेश तवडकर यांनी दिलेली माहिती, दिल्ली दौऱयात भेट घेऊन दिले आमंत्रण
प्रतिनिधी /काणकोण
यंदाच्या लोकोत्सवात केंद्र सरकारच्या विविध योजनांतर्गत सहकार्य घेऊन आमोणे येथील आदर्श ग्राम कायमस्वरूपी ग्रामीण कला केंद्र बनविण्याच्या दृष्टीने राज्याचे माजी आदिवासी कल्याणमंत्री रमेश तवडकर यांनी लक्ष दिले आहे. यंदाच्या आदर्श ग्रामातील लोकोत्सवास केंद्रीय आदिवासी कल्याणमंत्री अर्जुन मुंडा हे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती तवडकर यांनी दिली आहे.
विविध आदिवासी कल्याण योजनांचा आदर्श ग्रामासाठी कसा लाभ करून घेता येईल यासंबधी नुकत्याच झालेल्या दिल्ली भेटीत तवडकर यांनी चर्चा केली आणि आदिवासी कल्याणमंत्री मुंडा यांना लोकोत्सवाचे आमंत्रण दिले. खास आदर्श ग्रामातील योजनांसाठी निवेदन देण्यात आले आहे, अशी माहिती तवडकर यांनी दिली. केंद्रातील कला व सांस्कृतिक खात्याकडे असलेल्या योजनांच्या संदर्भात केंद्रीय सांस्कृतिकमंत्री जयकिशन रेड्डी यांची भेट घेऊन त्यांनाही एक निवेदन देण्यात आले आहे. सांस्कृतिक खात्याकडे असलेल्या विविध योजनांचा लाभ त्यायोगे आदर्श ग्रामला मिळणार आहे, असे तवडकर यांनी सांगितले. ग्रामीण विकास यंत्रणेचे मंत्री फगनसिंह कुलस्ते यांचीही आपण भेट घेतली. ग्रामीण भागांतील विकासासाठी असलेल्या योजना आदर्श ग्रामासाठी कशा उपयुक्त ठरतील यासंदर्भात चर्चा करून त्यांनाही निवेदन देण्यात आले आहे. त्याशिवाय ट्रायफडचे व्यवस्थापकीय संचालक जी. कृष्णा यांचीही या दौऱयात भेट घेण्यात आली. आदर्श ग्राम पूर्णपणे सांस्कृतिक केंद्र बनविण्याच्या दृष्टीने आता खऱया अर्थाने काम सुरू झालेले आहे. येणाऱया काळात त्याची फळे दिसायला लागतील, अशी माहिती तवडकर यांनी दिली.