ऑनलाईन टीम / शिमला :
कोरोना महामारी संकटात हिमाचल प्रदेशाला मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्राकडून हिमाचल प्रदेशाला 500 व्हेंटिलेटर मिळाले आहेत.
याबाबत अधिक माहिती देताना अतिरिक्त मुख्य सचिव आर डी धिमान यांनी सांगितले की, हिमाचल प्रदेशाला 500 व्हेंटिलेटर देण्यात आले आहेत. ते वेग वेगळ्या हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात येणार आहेत. त्यामुळे आता हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरची कमतरता जाणवणार नाही. त्यामुळे कोरोना रुग्णांना देखील आता अधिक सुविधा उपलब्ध होणार आहे.
पुढे ते म्हणाले, मागच्या वेळी मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर झालेल्या संवादात पंतप्रधानांकडे व्हेंटिलेटरच्या कमतरतेविषयी चिंता बोलून दाखवली होती आणि हिमाचल प्रदेशाला व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्यासाठी आग्रह धरला होता.
दरम्यान, आता उपलब्ध झालेले व्हेंटिलेटर मेडिकल कॉलेज, जिल्हा रुग्णालय आणि कोविड केअर सेंटरमध्ये स्थापित केले जाणार आहेत. 178 ट्रान्सपोर्ट व्हेंटिलेटर आणि अन्य आयसीयू व्हेंटिलेटर हे उत्तर प्रदेशाला निःशुल्क देण्यात आले आहेत. हे व्हेंटिलेटर एचएलएलच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले आहेत आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडद्वारा तयार करण्यात आले आहेत.