प्रतिनिधी / कुपवाड
केंद्राच्या सूक्ष्म, लघु व मध्यम खात्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ जिल्ह्यातील उद्योगांना मिळवुन देण्यासाठी तसेच त्यामध्ये येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी निश्चितपणे प्रयत्नशील राहु, अशी ग्वाही केंद्रीय सूक्ष्म लघु मध्यम उद्योग बोर्डाचे सदस्य प्रदीप पेशकर यांनी दिली. जिल्हाधिकारी डॉ.अभिजित चौधरी यांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीमध्ये ते बोलत होते.
यावेळी पेशकर म्हणाले, सूक्ष्म लघु व मध्यम उद्योगांच्या विकासासाठी या विभागाकडून अनेक योजना राबवल्या जात आहेत. परंतु, त्याचा लाभ उद्योजकांना मिळण्यासाठी अनेक अडचणी येतात. अशा उद्योजकांच्या तक्रारी आहेत. त्या स्थानिक पातळीवर निराकारण करणे गरजेचे आहे. त्यासाठी स्थानिक प्रशासनाने कारवाई करावी. तसेच त्यातून काही धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक असल्यास त्याचा निश्चित विचार सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग विभाग करेल असे ते म्हणाले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी उद्योगांसाठी केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा लाभ देण्यासाठी व अडचणी सोडवण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही दिली. खासदार संजयकाका पाटील यांनी जिल्ह्यातील उद्योग क्षेत्राच्या वाढीसाठी सूचना दिल्या व केंद्राकडे आवश्यक त्या गोष्टीसाठी पाठपुरावा करू असे सांगितले.
यावेळी आमदार सुधीरदादा गाडगीळ, भाजप शहर जिल्हाध्यक्ष दीपकबाबा शिंदे,भाजप पश्चिम महाराष्ट्र संयोजक संजय आराणके, जिल्हा उद्योग केंद्राचेमहाव्यवस्थापक नितीन कोळेकर, उपाध्यक्ष रमेश आरवाडे, उद्योग आघाडीचे अध्यक्ष शरद नलवडे, रवी भिडे, आनंद जोशी आदी उपस्थित होते.