नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
कोरोना लसीचा तुटवडा भरून काढण्यासाठी एका ऐवजी दहा कंपन्यांना लस निर्मितीचं लायसन्स दिलं पाहिजे, अशी सूचना केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्र सरकारला केली होती. मात्र सरकारने आधीच हा निर्णय घेतल्याचं समजल्यानंतर गडकरी यांनी सरकारच्या या निर्णयाबद्दलची मला माहिती नव्हती, अशी जाहीर कबुली दिली.
नितीन गडकरी यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. काल स्वदेशी जागरण मंचकडून आयोजित परिषदेत बोलताना मी लसनिर्मिती वाढवण्यासाठी सल्ला दिला होता. माझ्या भाषणाआधीच केंद्रीय रसयान आणि खत राज्यमंत्री मनसुख मांडविया यांनी लसनिर्मिती वाढवण्यासाठी सरकारकडून सुरु असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली होती याची मला कल्पना नव्हती, असं नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे.
परिषदेनंतर त्यांनी मला केंद्र सरकार १२ वेगवेगळ्या कंपनींकडून लसनिर्मितीसाठी मदत घेत असून या प्रयत्नांमधून भविष्यात निर्मिती वाढण्याची अपेक्षा आहे असं त्यांनी मला कळवलं, असंही नितीन गडकरींनी सांगितलं आहे.
गडकरी यांनी काल माध्यमांशी संवाद साधताना हा सल्ला दिला होता. व्हॅक्सीनची मागणी वाढली आहे. त्यामुळे व्हॅक्सीन बनविणाचं लायसन्स एका कंपनी ऐवजी दहा कंपन्यांना दिलं पाहिजे. आधी या कंपन्यांना भारतात व्हॅक्सीनचा पुरवठा करू द्या. त्यानंतर व्हॅक्सीन जास्त असतील तर त्या निर्यात करा, असं गडकरींनी सांगितलं होतं.