नवी दिल्ली
कोरोना विषाणूच्या संकटात सर्व राज्यांकडील निधी समाप्त होत आला आहे. राज्य सरकारांना अतिरिक्त उत्पन्न मिळत नसल्यामुळे राज्यांना आपले कारभार सुरु ठेवणे कठीण होत होते. परंतु यावेळी केंद्राने राज्य सरकारांना 36,400 कोटी रुपयांची जीएसटीची रक्कम वितरीत केली आहे. यामुळे अडचणीत असणाऱया राज्य सरकारांना दिलासा मिळणार असल्याचे म्हटले जात आहे. केंद्राने एप्रिल ते नोव्हेंबर 2019 या कालावधीमधील 1,15,096 कोटी रुपयांची जीएसटी रक्कम या अगोदरच राज्य सरकारांना दिलेली आहे. 2018-19 मध्ये राज्यांना एकूण 69,275 कोटींची जीएसटी रक्कम दिली होती. 2017-18 या कालावधीत 41,146 कोटी रुपये दिले होते. सरकारने मात्र एप्रिल महिन्यात लॉकडाऊनमुळे जीएसटी महसूलाची माहिती सादर केलेली नाही.