प्रतिनिधी /वास्को
केंद्रीय मच्छीमार, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय राज्यमंत्री डॉ. एल. मुरूगन यांनी नुकतीच अधिकाऱयांसमवेत मुरगांव बंदरात नांगरून ठेवलेल्या एमएफव्ही सागरीका व एमएफव्ही यलोफीन जहाजाला भेट दिली.
यावेळी गोवा किनारपट्टीवर एमएफव्ही यलोफिन जहाजावर डेमो फिशिंग ऑपरेशन आयोजित करण्यात आले. भारतीय मात्स्यिकी सर्वेक्षण विभागाचे मुंबई येथील महासंचालक डॉ. आर. जयभास्करन, मंत्र्यांचे निजी सचिव केदार बुरंडे, भारतीय मात्स्यिकी सर्वेक्षण मुरगांव विभागाचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
भारतीय मात्स्यिकी सर्वेक्षण विभागाचे महासंचालक डॉ. आर. जयबास्करन यांनी भारताच्या पश्चिम मध्य किनाऱयावरील संसाधन क्षमतेची माहिती मच्छीमार मंत्र्यांना दिली. भारतीय मात्स्यिकी सर्वेक्षण मुरगांव विभागाचे विभाग संचालक डॉ. एस. रामचंद्रन यांनी भारतीय मात्स्यिकी सर्वेक्षण मुरगांव विभागाच्या कामाची माहिती दिली. मत्स्य शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप यांनी एमएफव्ही यलोफिन जहाजावरील विविध प्रकारच्या मासेमारी पद्धतीची माहिती दिली. एन. उन्नीकृष्ण, राज नागपुरे यांनीही मुरगांव विभागाच्या कार्याची माहिती दिली.
यावेळी जहाजावरील कर्मचाऱयांशी मंत्र्यांनी संवाद साधला. मंत्र्यांनी भारतीय मात्स्यिकी सर्वेक्षण विभागाच्या मुरगांव विभागाच्या कार्याचे कौतुक केले.