ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनर्सच्या महागाई भत्त्यात 3 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला.
महागाई भत्ता केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनर्सना दिला जातो. महागाईची तीव्रता कमी करणं हा यामागील उद्देश असतो. AICPI-IW च्या डिसेंबरच्या डेटापासून कर्मचारी महागाई भत्ता वाढीच्या घोषणेची वाट पाहत होते. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत 3 टक्के महागाई भत्ता वाढीची घोषणा करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांना 31 टक्के महागाई भत्ता मिळत होता. आता 34 टक्के महागाई भत्ता मिळणार आहे. या निर्णयाचा फायदा 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनर्सना होणार आहे.
महागाई भत्ता वर्षातून दोन वेळा बदलला जातो. महागाई भत्ता हा कर्मचारी शहरी, निम शहरी आणि ग्रामीण भागात काम करतो यावर अवलंबून असतो. गेल्या वर्षी महागाई भत्ता 17 टक्क्यांवरून 28 टक्के केला होता. त्यानंतर कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात म्हणजेच ऑक्टोबर 2021 मध्ये महागाई भत्ता आणखी तीन टक्के वाढवण्यात आला. त्यामुळं तो 31 टक्क्यांवर पोहोचला होता. आता तो 34 टक्के करण्यात आला आहे.