राष्ट्रीय फॉरेंसिक विद्यापीठ, संजीवनीत इथेनॉल प्रकल्पाची पायाभरणी : पणजीत भाजपच्या आमदारांसोबत बैठक, ताळगाव येथे जाहीर सभेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार
प्रतिनिधी /पणजी
भाजपचे वरिष्ठ नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दि. 14 रोजी गोव्यात भाजपच्या कार्यकर्त्यांना ताळगाव येथील सभागृहात मार्गदर्शन करणार आहेत. त्याचबरोबर भाजपचे गोव्याचे निवडणूक निरीक्षक देवेंद्र फडणवीस हे देखील दोन दिवसांच्या गोवा भेटीवर याच दरम्यान येणार असून भाजपचे आमदार व मंत्र्यांबरोबर स्वतंत्ररित्या ते चर्चा करणार आहेत.
अमित शहा हे दि. 14 रोजी सकाळी 9 वा. गोव्यात येतील. त्यानंतर ते धारबांदोडा येथे जातील. तिथे राष्ट्रीय फॉरेंसिक विद्यापीठाची पायाभरणी करतील. तेथून ते संजीवनी साखर कारखान्याला भेट देतील. तिथे इथेनॉल प्रकल्पासाठी पायाभरणी करतील. तेथून ते पणजी येतील व सर्किट हॉऊसवर ते मंत्री आणि भाजप आमदारांबरोबर बैठका घेतील. त्यानंतर ताळगाव येथील कम्युनिटी सभागृहात भाजप कर्यकर्त्यांच्या जाहीर सभेत ते मार्गदर्शन करतील व सायंकाळी ते दिल्लीला परततील.
दरम्यान, या निमित्ताने भाजपचे गोवा निरीक्षक सी. टी. रवी हे देखील दि. 13 रोजी गोव्यात येतील. भाजपचे गोवा निवडणूक निरीक्षक देवेंद्र फडणवीस हे देखील दि. 13 रोजी गोव्यात येत असून ते भाजप पदाधिकाऱयांबरोबर आणि गाभा समितीबरोबर बैठक घेतील. अमित शहा हे आमदारांबरोबर जेव्हा बैठक घेणार आहेत. त्यावेळी देवेंद फडणवीस व सी. टी. रवी हे देखील उपस्थित राहाणार आहेत. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप स्वबळावर 22 चा आकडा पार कसा करील या संदर्भात फडणवीस हे भाजपच्या कोअर समितीकडे चर्चा करतील.