प्रतिनिधी/ पणजी
सत्तरीत म्हादई अभयारण्य क्षेत्रात मृतावस्थेत सापडलेल्या वाघांच्या मृत्यूची चौकशी केंद्रीय वन मंत्रालयाच्या पथकामार्फत करण्याची मागणी करणार असल्याचे वाळपई मतदारसंघाचे आमदार व आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी स्पष्ट केले. म्हादई अभायारण्य क्षेत्रात एकाचवेळी चार मृत वाघ सापडल्याने खळबळ माजली आहे.
वनक्षेत्रात वाघ, वाघीण आणि त्यांचे बछडे मृतावस्थेत सापडले. या प्रकरणी आपण केंद्रीय वनमंत्री प्रकाश जावडेकर यांना विनंती करणार असून केंद्रीय पथक पाठवून सखोल चौकशी करण्याची मागणी करणार आहे. आपल्या मतदारसंघ क्षेत्रात वाघांचा मृत्यू व्हावा ही धक्कादायक बाब आहे. त्यामुळे या प्रकरणी सखोल चौकशी केली जाणार असल्याचे ते म्हणाले.