खासदार ए. नारायणस्वामी, शोभा करंदलाजे यांची नावे आघाडीवर
प्रतिनिधी /बेंगळूर
केंद्रीय मंत्रिमंडळ पुनर्रचनेचा मुहूर्त निश्चित झाल्यानंतर मंत्रिपद पटकावण्यासाठी कर्नाटकातूनही इच्छुक खासदारांनी दिल्ली गाठली आहे. राज्यातून दोघांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे. चित्रदुर्गचे खासदार ए. नारायणस्वामी यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तविली जात असून ते पत्नी आणि मुलांसमवेत मंगळवारी दिल्लीला रवाना झाले. तर उडुपी-चिक्कमंगळूरच्या खासदार शोभा करंदलाजेंनाही मंत्रिमंडळात संधी मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
खासदार ए. नारायणस्वामी यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान द्यावे, अशी मागणी करून मादीग समाजातील नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, राज्याचे मुख्यमंत्री येडियुराप्पा यांना पत्र पाठवून दबाव आणला होता. नारायणस्वामी चार वेळा लोकसभेवर निवडून आले आहेत. तसेच चार वेळा विधानसभेवरही निवडून आले होते. राज्य मंत्रिमंडळात समाजकल्याण खातेही सांभाळल्याचा अनुभव त्यांना आहे. याच दरम्यान, महिला कोटय़ातून खासदार शोभा करंदलाजे यांचे पारडे जड आहे. त्यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे. बागलकोटचे खासदार पी. सी. गद्दीगौडर, हावेरी-गदग लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवकुमार उदासी, गुलबर्ग्याचे खासदार उमेश जाधव, बेंगळूर सेंट्रलचे खासदार पी. सी. मोहन यांचीही नावे चर्चेत असून ते देखील दिल्लीत ठाण मांडून आहेत.
सदानंदगौडांना वगळणार?
केंद्रीयमंत्री डी. व्ही. सदानंदगौडा यांना सोडचिठ्ठी मिळण्याची शक्यता आहे. जर त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळातून वगळण्यात आले, तर त्यांच्या जागी खासदार पी. सी. मोहन यांना संधी मिळण्याची शक्यता असल्याचे सुत्रांकडून समजते.