अनेक इच्छुक दिल्लीत, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत अंतिम निर्णय शक्य
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
राजधानी दिल्लीत सध्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची जोरदार चर्चा आहे. आज बुधवारी सकाळी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. या बैठकीत इतर अनेक महत्वाच्या विषयांसोबतच मंत्रिमंडळ विस्तारवरही अंतिम हात फिरवला जाण्याची शक्यता आहे. या विस्तारात तरूण रक्ताला वाव मिळेल असे बोलले जात असून काही माजी मुख्यमंत्र्यांचाही समावेश होण्याची अटकळ आहे. 17 ते 18 नव्या मंत्र्यांचा समावेश होऊ शकतो अशी माहिती सूत्रांनी दिली. बुधवारीच संध्याकाळी नव्या मंत्र्यांचा शपथविधीही होऊ शकतो, असे बोलले जात आहे.
मध्यप्रदेशातील माजी काँगेस नेते आणि आता भाजपमध्ये आलेले ज्योतिरादित्य सिंदिया यांचा मंत्रिमंडळात समावेश निश्चित मानला जात आहे. ते स्वतः मंगळवारी दुपारीच दिल्लीत उपस्थित झाले आहेत. त्यांच्यासह आसामचे माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल तसेच आणखी काही माजी मुख्यमंत्री यांचीही वर्णी लागण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
संजदही इच्छुक
2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दल पक्षाने केंद्रीय मंत्रिमंडळात समाविष्ट होण्यास नकार दिला होता. मात्र, आता समाविष्ट होण्याची इच्छा त्या पक्षाने व्यक्त केली आहे. दोन मंत्रिपदे देण्याची मागणी या पक्षाने केली असून चर्चा करण्यासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते आर. पी. सिंग हे दिल्लीत आले आहेत. त्यामुळे संजदचाही समावेश मंत्रिमंडळात होणार का, यावर बरीच परस्परविरोधी मते व्यक्त होत आहेत. या पक्षाच्या वाटय़ातून मंत्रिपदासाठी लालनसिंग आणि आर. पी. सिन्हा यांची नावे चर्चेत आहे. या पक्षाला एक कॅबिनेट व एक राज्यमंत्रीपद मिळू शकते.
वायएसआर काँगेस काय करणार
आंध्र प्रदेशात सत्ताधारी असणारा वायएसआर काँगेस पक्ष रालोआचा मित्रपक्ष आहे. या पक्षाने केंद्रीय मंत्रिमंडळात समाविष्ट व्हावे यासाठी भाजपने प्रयत्न चालविले आहेत. आतापर्यं आंध्रचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही. तथापि, त्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी मंगळवारी चर्चा झाली. त्यामुळे ही शक्यताही असल्याचे बोलले जाते.
देवदर्शनाच्या वेळीच बोलावणे
ज्योतिरादित्य सिंदिया मंगळवारी महाकाल मंदिरात देवदर्शनासाठी गेले होते. त्याचवेळी त्यांना दिल्लीहून मोबाईलवर बोलावणे आले. ते त्वरित देवदर्शन आटोपून दिल्लीला येण्यासाठी निघाले, असे त्यांच्या निकटवर्तीयांनी स्पष्ट केले. त्यांना केंद्रात महत्वाचे कॅबिनेट खाते मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ते 2019 मध्ये भाजपमध्ये आलेले असून त्यामुळे मध्यप्रदेशातील काँगेसचे सरकार कोसळले होते.
लोकजनशक्तीत वादावादी
लोकजनशक्ती पक्षात केंद्रीय मंत्रिमंडळात कोणाचा समावेश करावा यावरून वादावादी सुरू झाली आहे. नुकतीच पक्षात फूट पडली असून चिराग पास्वान आणि त्यांचे काका पशुपती पारस यांनी त्यांचा पक्षच खरा लोकजनशक्ती असल्याचा दावा केला आहे. या पक्षाच्या वाटय़ातून पारस यांचा समावेश मंत्रिमंडळात होण्याची शक्यता आहे. मात्र, या शक्यतेवर चिराग पास्वान यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.