बसवसागर जलाशयाची करणार पाहणी
बेंगळूर : केंद्रीय जलशक्ती खात्याचे मंत्री गजेंद्रसिंग शेखावत मंगळवारी नारायणपूर (बसवसागर) जलाशयाला भेट देऊन पाहणी करणार आहेत. त्यासाठी ते यादगीर जिल्हा दौऱयावर येणार आहेत, अशी माहिती जलाशयाच्या अधिकाऱयांनी दिली आहे. मंगळवारी सकाळी गजेंद्रसिंग शेखावत दिल्लीवरून बेंगळूरला येतील. नंतर तेथून नारायणपूरला पाहोचतील. बसवसागर जलाशयासाठी निर्माण करण्यात आलेल्या स्वयंचलित दरवाज्यांविषयी अधिकाऱयांकडून माहिती घेतील.
शेखावत यांच्या दौऱयानिमित्त यादगीर जिल्हा प्रशासन आणि कृष्णा भाग्य जलनिगमच्या अधिकाऱयांनी पूर्वतयारी केली आहे. बसवसागर जलाशय यापूर्वी नारायणपूर जलाशय या नावाने ओखळले जात होते. हुणसगी तालुक्यातील नारायणपूर येथे कृष्णा नदीवर हे जलाशय असून त्याची उंची 30 मीटर आहे. तर पाणीसाठा क्षमता 37 टीएमसी इतकी आहे. शेती आणि पिण्यासाठी पाणीपुरवठा करण्याच्या उद्देशाने 1982 मध्ये हे जलाशय बांधण्यात आले होते.