विविध रस्ताकामांचे होणार उद्घाटन
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव-संकेश्वरच्या सहापदरी रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. याचबरोबर बेळगाव-जांबोटी-साखळी, विजापूर-मुरगुंडी, सिद्धापूर-विजापूर या रस्त्यांच्या कामांना निधी मंजूर झाला आहे. या सर्व कामांचा शुभारंभ केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्याचे उद्घाटन करण्यासाठी सोमवार दि. 28 रोजी ते बेळगावात दाखल होणार आहेत, अशी माहिती खासदार मंगला अंगडी यांनी ‘काडा’ कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
नेहरुनगर येथील जिल्हा क्रीडांगणावर या समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी 10 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. एकूण 238 किलोमीटर लांबीच्या पाच राष्ट्रीय महामार्गांसाठी 23 हजार 972 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्या सर्व रस्ता कामांचा शुभारंभ गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. बेळगाव-संकेश्वर या 40.7 किलोमीटर रस्त्याचे सहापदरीकरण होणार आहे. एकूण 1479.3 कोटी रुपये त्यासाठी मंजूर झाले आहेत. संकेश्वरपासून महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत हा रस्ता होणार आहे. त्यासाठीही 1388.7 कोटी मंजूर झाले आहेत.
राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 ए वरील बेळगाव-जांबोटी-साखळीपर्यंतच्या रस्त्यासाठी 246.78 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. एकूण 69.70 किलोमीटरचा हा रस्ता आहे. त्याचे दुपदरीकरण होणार आहे. विजापूर-मुरगुंडी रस्त्याच्या दुपदरीकरणासाठी 79.70 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. सिद्धापूर-विजापूर या 11.62 किलोमीटर रस्त्यासाठी 90.13 कोटी रुपये मंजूर झाले असून त्याचेही दुपदरीकरण होणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुराव्यामुळे हे रस्ते मंजूर झाले आहेत. मंत्रिमहोदयांच्या हस्ते या रस्ता कामांचे उद्घाटन होणार असल्याची माहिती खासदार मंगला अंगडी यांनी दिली आहे.