ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
लॉकडाऊनच्या काळात अनेक क्षेत्रातील मंडळी मदतीसाठी पुढे आली. त्यातच अभिनेता सोनू सूद सातत्याने सर्वांची मदत करत आहे. आता सोनू सूद लॉक डाऊनमुळे अडकलेल्या स्थलांतरित मजुरांना पुन्हा त्यांच्या घरी परतण्यास मदत करत आहे. सोनू सूदने आता पर्यंत हर प्रकारे केलेल्या मदतीसाठी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी सोनू सूद चे ट्विट च्या माध्यमातून कौतुक केले आहे.
त्या आपल्या ट्विट मध्ये म्हणतात की, एक सहकारी म्हणून जवळपास दोन दशकांपासून तुला ओळखण्याचे भाग्य मला लाभलं आहे. तुला एक अभिनेता म्हणून मोठं होताना पहिलं आहे. पण या कठीण काळात तू दाखवलेल्या माणुसकीमुळे तो अभिमान कायम ठेवला आहे. गरजूंना मदत केल्याबद्दल आभार! असे म्हटले आहे.
दरम्यान, सोनू सूद महाराष्ट्रात अडकलेल्या स्थलांतरित मजूरांना घरी पाठवण्यासाठी स्वतः रस्त्यावर उतरला असून मजूर आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी बसेसची व्यवस्था करत आहे. आता पर्यंत त्याने कर्नाटक मधील गुलबर्गा आणि उत्तर प्रदेशसाठी बसेस पाठवल्या आहेत. तसेच सोनू सूद ने एक लाख पेक्षा अधिक लोकांची जेवणाची सोय, स्वतः च्या हॉटेलमध्ये डॉक्टरांची राहण्याची सोय, पंजाब मधील डॉक्टरांसाठी 1500 पीपीई किट देखील पाठवले आहेत. त्याने केलेल्या मदतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.