कोरोना संसर्गामुळे दिल्लीत ‘एम्स’मध्ये सुरू होते उपचार : बेळगाव जिल्हय़ात हळहळ व्यक्त
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे बुधवारी सायंकाळी निधन झाले. पंधरा दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यांच्यावर दिल्लीमध्ये उपचार सुरू होते. अधिवेशनाच्या निमित्ताने दिल्लीत गेल्यानंतर स्वॅब तपासणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी शोक व्यक्त केला आहे. अंगडी यांच्या निधनाचे वृत्त समजताच बेळगाव शहरासह संपूर्ण जिल्हय़ात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
प्रतिनिधी / बेळगाव
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी 11 सप्टेंबर रोजी बेळगावमधून दिल्लीला गेले होते. दिल्लीत दाखल होताच त्यांनी कोरोना चाचणी केली होती. कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी स्वतः त्यासंबंधी ट्विटरवरुन माहिती देत आपल्या संपर्कातील नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले होते. अहवाल पॉझिटिव्ह आला असला तरी त्यांना कसलीच लक्षणे नव्हती. आरोग्य उत्तम असल्याचा दावा त्यांनी केला होता. आपण डॉक्टरांचा सल्ला घेतला असून वैद्यकीय तज्ञांच्या देखरेखीखाली असल्याचेही त्यांनी म्हटले होते. कोरोनामुळे प्रकृती बिघडल्याने त्यांना ‘एम्स’ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याठिकाणीच त्यांनी 23 सप्टेंबर रोजी सायंकाळी अखेरचा श्वास घेतला.
आतापर्यंत केंद्रीय मंत्रिमंडळातील सात जणांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. केंदीय गृहमंत्री अमित शहा, कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी, आयुष मंत्री श्रीपाद नाईक, जलशक्ति मंत्री गजेंद्रसिंग शेखावत, संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल आणि पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान या अन्य केंद्रीय मंत्र्यांनाही कोरोना झाल्याचे तपासणीअंती आढळून आले होते.
राजकीय क्षेत्राची प्रचंड हानी
सुरेश अंगडी यांच्या निधनामुळे राजकीय क्षेत्राची प्रचंड हानी झाली असून प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे. एक स्वच्छ चारित्र्याचा नेता हरपला अशी प्रतिक्रिया बेळगाव शहर आणि जिल्हय़ातून व्यक्त होत आहे. कन्नड आणि मराठी भाषिकांत समतोल साधणारा एक नेता हरपला अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांतून व्यक्त झाली. 2004, 2009, 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत विजयी होण्याचा मान त्यांनी मिळवला. यावेळी चौथ्यांदा खासदार झाल्याने त्यांना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री होण्याचा बहुमान मिळाला होता. तसेच सध्या कर्नाटकातील मुख्यमंत्री बदलाचे वारे वाहात असताना या पदाचा नवा चेहरा म्हणून त्यांची चर्चा होती. अशा वातावरणात सुरेश अंगडी यांनी एक्झिट घेतल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
एक चांगला मित्र गमावला : किरण ठाकुर
सुरेश अंगडींच्या निधनामुळे साऱया बेळगावच्या जनतेला धक्का बसला आहे. व्यापार क्षेत्राकडून राजकारणाकडे वळलेला, प्रेमाने हसतखेळत सर्वांशी वागणारा तसेच धडपडणारे एक उमदे व्यक्तिमत्त्व आज आपल्यातून निघून गेले आहे. तुम्ही कितीही रागाने बोललात तरीही हसत हसत उत्तर देणारा जवळचा मित्र हरपल्याचे दु:ख माझ्यासह अनेकांना झाले आहे. सर्व जनतेशी त्यांचे प्रेमाचे संबंध होते आणि आपल्या चारवेळच्या यशात महाराष्ट्र एकीकरण समितीचा फार मोठा वाटा आणि मोलाचे योगदान असल्याचे ते स्वतः खासगीत बोलून दाखवायचे, अशी प्रतिक्रिया तरुण भारतचे समुह प्रमुख व सल्लागार संपादक किरण ठाकुर यांनी व्यक्त केली.
पहिल्या निवडणुकीपासून आजवरच्या निवडणुकीत आपण मराठी जनतेच्या मतांवरच प्रचंड बहुमताने निवडून येतो हे अनेकवेळा त्यांनी खासगीत बोलून दाखवलं होते. रेल्वे राज्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्याकडून नव्या योजना साकारताना पाहायला मिळाल्या. बेळगावपासून अनेक नव्या रेल्वे सुरू करण्यात त्यांचे योगदान मोठे आहे.
दररोज सकाळी मॉर्निंग वॉकला जात असताना त्यांची भेट व्हायची. त्यांना कोरोना झाला अशी माहिती कळताच आपण स्वतः त्यांना फोन करुन आपण लवकर बरे व्हा अशी अपेक्षा साऱया जनतेची आहे, हे त्यांना सांगितले होते. ते सिमेंटचे व्यापारी होते तेव्हापासून आमचे संबंध होते. समिती नेते दिवंगत जगदीश सारडा यांच्याशी त्यांचा स्नेह होता, त्यातून मैत्रीचे संबंध आले. एक चांगला मित्र गमावला याची खंत आहे, असे किरण ठाकुर म्हणाले.
परिचय…
- जन्म : 1 जून 1955
- (के. के. कोप्प येथे)
- वडील : चन्नबसप्पा अंगडी
- आई : सोमव्वा अंगडी
- पत्नी : मंगल सुरेश अंगडी
- मुली : दोन
- पदवीपूर्व शिक्षण : वाणिज्य एस. एस. एस. समिती कॉलेज, बेळगाव
- पदवी शिक्षण : एलएलबी, आर. एल. लॉ कॉलेज, बेळगाव
संपूर्ण देशाची हानी…
केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनाचे वृत्त ऐकून आपल्याला धक्काच बसला आहे. लोकप्रिय ठरलेले अंगडी यांच्या निधनामुळे केवळ पक्षाचे, राज्याचीच नव्हे तर संपूर्ण देशाची मोठी हानी झाली आहे.
– येडियुराप्पा, मुख्यमंत्री
राजकीय प्रवास…
- 1996 ते 1999 बेळगाव जिल्हा भाजप उपाध्यक्ष
- 2001 बेळगाव जिल्हा भाजप अध्यक्ष
- 2004………… पहिल्यांदा खासदार
- 2009…….. दुसऱयांदा लोकसभेवर
- 2014….. तिसऱयांदा संसदेत प्रवेश
- 2019 चौथ्यांदा खासदारपदी निवड
- 30 मे 2019 केंद्रीय रेल्वे राज्यमंत्रिपदी शपथबद्ध
- 2016 ते 2019 पार्लमेंट हाऊस कमिटीचे अध्यक्ष
धक्कादायक…
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे निधन धक्कादायक आहे. आपले उत्तम स्नेही असणारे सुरेश अंगडी हे राज्याच्या विकासाच्या बाबतीत अधिक तत्पर होते. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी आहे.
– सिद्धरामय्या, विधानसभा विरोधी पक्षनेते