नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांना आज अचानक रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोरोनानंतर तब्येतीच्या तक्रारीमुळे त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आले. एम्स रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी याची माहिती ANI या न्यूज एजन्सीला दिली आहे. दरम्यान, बारावीच्या परीक्षेसंदर्भातील आजची घोषणाही पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या समस्यांमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शिक्षणमंत्री निशंक यांनी २१ एप्रिल रोजी ट्वीटद्वारे माहिती दिली होती की त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यासह ते म्हणाले होते की, जे लोक माझ्या संपर्कात आले त्यांनी करोना चाचणी करावी. मंत्रालयाचे काम नेहमीप्रमाणे सुरूच राहिल, असेही त्यांनी म्हटले होते.
बारावीच्या परीक्षेसंदर्भात केंद्रीय शिक्षण मंत्रालय निर्णय घेणार असून आज शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल या संदर्भात घोषणा करणार असल्याची शक्यताही वर्तवण्यात आली होती. घोषणा करण्यापूर्वी शिक्षणमंत्री पंतप्रधान मोदींना या विषयी माहिती देणार असल्याची शक्यताही वर्तवण्यात आली होती.