ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
केंद्र सरकारने 30 लाख विना-राजपत्रित सरकारी कर्मचाऱ्यांना 3737 कोटी रुपयांचा दिवाळी बोनस देण्याची घोषणा केली आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यासंदर्भात माहिती दिली.
जावडेकर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत मंत्रिमंडळाने 2019-20 या आर्थिक वर्षासाठी उत्पादकता आणि बिगर उत्पादकतेशी संबंधित कर्मचाऱ्यांच्या बोनसला मंजुरी दिली आहे. बोनसची रक्कम डीबीटीच्या (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या खात्यात पाठवली जाईल. दसरा किंवा दुर्गा पूजेपुर्वी या बोनसचे नागरिकांना वाटप करण्यास सुरुवात होईल.
बोनसमुळे केंद्र सरकारच्या तिजोरीवर 3737 कोटी रुपयांचा भार पडणार आहे. दरम्यान, मागील आठवड्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पेशल फेस्टिव्हल ॲडव्हान्स योजना सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार कर्मचाऱ्यांना 10,000 रुपये आगाऊ घेता येतील.