ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
केंद्र सरकारकडून लागू करण्यात आलेल्या नव्या आयटी नियमांची ट्विटरकडून अद्याप अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे केंद्र सरकारने ट्विटरला नोटीस पाठवून अखेरचा इशारा दिला आहे.
केंद्र सरकारने ट्विटरला दिलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, केंद्र सरकारने समाजमाध्यम क्षेत्रात सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना 26 मे पासून नवी आयटी नियमावली लागू केली. या नियमावलीचे पालन करण्यासाठी तीन महिन्यांची मुदतही देण्यात आली होती. नव्या नियमावलीनुसार, ट्विटरने भारतात चीफ कम्प्लायन्स ऑफिसरची नियुक्ती केली नाही. तसेच नेमलेले स्थानिक तक्रार निवारण अधिकारी आणि नोडल कॉन्टॅक्ट पर्सन हे ट्विटरचे अधिकृत कर्मचारी नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून ट्विटरला अखेरचा इशारा देण्यात आला आहे. ट्विटरने या नियमांचे पालन न केल्यास आयटी कायद्याच्या कलम 79 अंतर्गत ट्विटरला मिळणारे संरक्षण काढून घेतलं जाऊ शकते, असेही केंद्र सरकारने म्हटले आहे.