पेट्रोल-डिझेल दरकपातीने वाहनधारकांना किंचित दिलासा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केंद्र सरकारकडून पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केल्यानंतर राज्यांमधील व्हॅटमध्येही आपोआपच कपात होणार आहे. साहजिकच इंधन दरात आणखी दीड ते अडीच रुपयांपर्यंत कपात होणार असून राज्यांकडून त्याची अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे. सध्या काँग्रेसशासित राजस्थान सरकार आणि केरळ सरकारनेही व्हॅटमध्ये कपात केली आहे. पेट्रोलवरील व्हॅट 2 रुपये 48 पैसे आणि डिझेलवरील कर 1 रुपये 16 पैसे प्रतिलिटरने कमी करण्याचा निर्णय राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी घेतला आहे. केरळनेही पेट्रोलवरील व्हॅटमध्ये 2 रुपये 41 पैसे तर डिझेलवरील व्हॅट 1 रुपया 36 पैशांनी कमी केला आहे. केंद्राच्या कालच्या घोषणेनंतर राजस्थान आणि केरळच्या नागरिकांना दुहेरी फायदा मिळणार आहे. असाच निर्णय महाराष्ट्र सरकारनेही घेतला आहे.
केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क अनुक्रमे प्रतिलिटर 8 रुपये आणि 6 रुपये कमी केल्यामुळे या दोन्ही अत्यावश्यक वस्तूंचे दर आता अनुक्रमे प्रतिलिटर साधारणतः 9.50 रुपये आणि 7 रुपये स्वस्त झाले आहेत. केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर राज्य सरकारांनी देखील कर कमी करावेत, असे आवाहन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले आहे. अर्थमंत्र्यांना या आवाहनाला राज्यांनी दाद दिल्यास वाहनधारकांना आणखी काही प्रमाणात दरकपातीचा दिलासा मिळू शकतो.