गजाननराव भातकांडे शाळेचे अध्यक्ष मिलिंद भातकांडे यांची माहिती
बेळगाव :
बेळगाव शहरात लवकरच आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षण उपलब्ध होणार असून विद्या प्रसारक मंडळाला केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे, अशी माहिती गजाननराव भातकांडे शाळेचे अध्यक्ष मिलिंद भातकांडे यांनी दिली आहे.
सार्वजनिक शिक्षण खाते, कर्नाटक सरकार यांच्याकडून केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल सुरू करण्याची परवानगी नुकतीच मिळाल्याने लवकरच प्रवेश प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. कुंतीनगर (टीचर्स कॉलनी) येथील दोन एकर परिसरात पसरलेल्या प्रशस्त जागेत उभारण्यात आलेल्या इमारतीत केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल सुरू होणार आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. विशाल मैदान आणि इतर सुविधांमुळे केंब्रिज स्कूल शहरातील एक उत्कृष्ट स्कूल म्हणून येणाऱया काळात ओळखले जाईल, असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष मिलिंद भातकांडे यांनी व्यक्त केला आहे.
लंडन येथील प्रसिद्ध केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलच्या देशभरात 170 शाळा असून अत्याधुनिक वर्ग, प्रयोगशाळा, स्मार्ट शाळा, स्मार्ट वाचनालय, स्मार्ट क्लासरूम, स्पेशल डायनिंग रूम, संगणक क्लासरूम्स आदी सुविधा शाळेत असणार आहेत. केंब्रिजच्या प्री-प्रायमरी विभागाला मॉन्टेसरी प्री-स्कूलची प्रँचायझी मिळाली असून प्रवेश प्रक्रियेबाबत लवकरच अधिकृत माहिती दिली जाणार आहे. गजाननराव भातकांडे इंग्रजी माध्यम शाळा आणि केंब्रिज इंटरनॅशनल शाळा अशा दोन स्वतंत्र शाळा असतील, अशी माहिती मिलिंद भातकांडे यांनी दिली.