वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ब्रिटनस्थित केंब्रिज ऍनालिटीका या कंपनीविरोधात सीबीआयने अभियोग सादर केला आहे. 18 महिन्यांच्या तपासानंतर अभियोग सादर करण्यात आला. ग्लोबल सायन्स अँड रीसर्च या कंपनीविरोधातही हीच कारवाई करण्यात आली आहे. भारताच्या फेसबुक उपयोगकर्त्यांची व्यक्तिगत माहिती चोरल्याचा या कंपन्यांवर आरोप आहे. 5 लाख 62 हजार लोकांची व्यक्तीगत माहिती या कंपन्यांनी स्वतःच्या लाभासाठी अनुमतीशिवाय उपयोगात आणली असाही आरोप आहे.
या दोन्ही कंपन्यांचे संचालक अलेक्झांडर कोगन हे आहेत. त्यांनाही या प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे. त्यांच्यावर भारतीय दंडविधानांतर्गत गुन्हेगारी स्वरूपाचे कटकारस्थान करण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याचा भंग केल्याचाही आरोप नमूद करण्यात आला.
25 जुलै 2018 या दिवशी केंद्रीय सूचना आणि प्रसारण विभागाने या कंपन्यांविरोधात प्रथमदर्शनी अहवाल सीबीआयला सादर केला होता. या कंपन्यांनी माहिती तंत्रज्ञान अधिकाराचा गैरवापर केला असा विभागाचा आरोप होता. सीबीआयने अहवाल नोंदवून 18 महिने चौकशी केली.
या कंपन्यांनी फेसबुक या कंपनीकडून संशोधन आणि संस्थात्मक कामासाठी लक्षावधी लोकांची व्यक्तिगत माहिती घेतली होती. मात्र या माहितीचा उपयोग भारतातील निवडणुकांमध्ये मतदारांना एका पक्षाच्या बाजूला वळविण्यासाठी करण्यात आला, असे सरकारचे म्हणणे आहे. त्यामुळे कंपन्यांवर अभियोग सादर करण्यात आला आहे. सीबीआयने हजारो कागदपत्रही पुरावे म्हणून सादर केले आहेत.