प्रतिनिधी / चिकोडी
अंकली येथील दूध उत्पादक सहकारी संघाचे उपाध्यक्ष आण्णासाहेब पोदार यांच्या अकाली निधनामुळे केएमएफच्यावतीने त्यांच्या कुटुंबाला 10 हजार रुपयाची मदत देण्यात आली. अंकली येथील दूध उत्पादक सहकारी संघाचे उपाध्यक्ष आण्णासाहेब पोदार यांच्या सहकारी संस्थेतून केएमएफला दूध पुरवठा करण्यात येत होता. त्यामुळे केएमएफच्यावतीने पोदार यांच्या पत्नी अश्विनी पोदार यांना 10 हजार रुपयाचा मदतनिधी मंजूर करण्यात आला होता. सदर मदत निधीचे वितरण केएमएफचे संचालक व्ही. बी. ईटी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना ईटी यांनी, लवकरच दूध उत्पादक शेतकऱयांना कर्नाटक दूध उत्पादक सहकारी संघाच्या बेळगाव शाखेच्यावतीने अधिक दर देण्यात येणार आहे. कोरोनाच्या संकटकाळातही संस्थेने अत्यंत अडचणीतून वाटचाल केली होती. पण शेतकऱयांना याबाबत कोणताही त्रास होणार नाही याची खबरदारी घेण्यात आली होती. चिकोडी येथे लवकरच पाच ठिकाणी केएमएफची वितरण केंदे सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी महाधिराज शितोळे, संतोष लोकरे, व्ही. के. जोशी, एस. बी. पुजेरी, पुंडलिक ईटी, सुनील कुंभार उपस्थित होते.