प्रतिनिधी / बेळगाव
केएलई सोसायटीच्या डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल येथे नवीन अत्याधुनिक शस्त्रक्रिया विभाग सुरू करण्यात आला आहे. सोमवारी युनियन बँकेचे कार्यकारी संचालक राजकिरण यांच्या हस्ते या विभागाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी ते म्हणाले, राष्ट्राच्या प्रगतीसाठी नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाल्या पाहिजेत. आरोग्य सेवा हा एक अत्यंत महत्त्वाचा विभाग असून निरोगी समाज निरोगी राष्ट्र घडवू शकतो. नवतंत्रज्ञान सर्वच क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. याच तंत्रज्ञानाचा उपयोग करून दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्यसेवा देण्यास आरोग्य संस्थांनी कटिबद्ध राहिले पाहिजे.
संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांनी सांगितले की, 20 वर्षांपूर्वी आधुनिक उपचारासाठी लोकांना मुंबई, पुणे, मिरज येथे जावे लागत असे. मात्र गेल्या 15 वर्षात केएलई हॉस्पिटलमध्ये सर्वांनाच एकाच छत्राखाली सर्व आरोग्य सुविधा उपलब्ध होत
आहेत.
यावेळी डॉ. व्ही. एस. साधुण्णवर, डॉ. व्ही. आय. पाटील, अमित कोरे, डॉ. आर. बी. नेर्ली, कुलगुरु डॉ. विवेक सावजी, डॉ. एच. व्ही. राजशेखर, डॉ. व्ही. डी. पाटील, डॉ. अभिजीत गोगटे, डॉ. राजेश पवार, डॉ. व्ही. एम. शेट्टी, डॉ. प्रकाश महांतशेट्टी, डॉ. राजेश शेणॉय, डॉ. अभिषेक पाटील, डॉ. विक्रम, डॉ. प्रकाश राठोड उपस्थित होते.