प्रतिनिधी/ बेळगाव
केएलई डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटलमधील मधुमेह केंद्र देशातील सर्वोत्कृष्ट केंद्र आहे. या केंद्रासाठी काहेर विद्यापीठातर्फे सर्व ते सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विवेक सावजी यांनी दिली.
केएलई हॉस्पिटलमधील सदर केंद्रातर्फे 14 ते 22 मे पर्यंत मोफत उन्हाळी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. प्रमुख पाहुण्या म्हणून खासदार मंगला अंगडी, मनीषा सुभेदार उपस्थित होत्या. व्यासपीठावर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. ए. कोठीवाले, केंद्राचे तज्ञ डॉ. एम. व्ही. जाली, डॉ. सुजाता जाली, जेएनएमसीच्या प्राचार्या डॉ. निरंजना महांतशेट्टी व विभागप्रमुख डॉ. तन्मया आदी उपस्थित होते.
यावेळी मंगला अंगडी म्हणाल्या, लहान वयात मधुमेह होणे ही खेदजनक बाब आहे. परंतु या मुलांना वेगळे न वागविता सामान्य मुलांप्रमाणेच वागवावे, सकारात्मक मानसिकतेनेच पालकांनी त्यांच्याकडे पहावे.
मनीषा सुभेदार यांनी मुलांपेक्षा पालकांचे आणि शिक्षकांचे समुपदेशन गरजेचे आहे. मधुमेही मुलांना शाळेमध्ये पूरक असे वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे. तसेच मधुमेही मुलींचे शिक्षण पूर्ण करणे ही पालकांची जबाबदारी आहे, असे सांगितले.
यावेळी मधुमेही पाल्याची उत्कृष्ट माता म्हणून यमुना कोरेगिरी, उत्कृष्ट मधुमेही मुलगा म्हणून कृष्णा येडूर व मुलगी म्हणून पवित्रा कारगी यांना गौरविण्यात आले. मधुमेहाकडे आपण कसे पाहले पाहिजे, याबद्दल गौतमी हिने अनुभव कथन केले. या शिबिरात डॉ. दीपश्री या मुलांची नेत्रतपासणी करणार असून सर्व मुलांना मोफत इन्शुलीन देण्यात येणार आहे. प्रारंभी डॉ. एम. व्ही. जाली यांनी स्वागत केले. डॉ. सुजाता जाली यांनी केंद्राच्या कार्याचा आढावा घेताना या केंद्राला अनेक पुरस्कार मिळाले असल्याचे सांगितले.