प्रतिनिधी /बेळगाव
केएलई स्कूल ऑफ म्युझिकतर्फे 25 ते 27 मार्चदरम्यान ‘नादानुसंधानम्’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राजन शंकर यांनी भारतीय शास्त्रीय संगीताचा वापर म्युझिक थेरपीसाठी कसा करतात याचे प्रात्यक्षिकासह विश्लेषण केले. प्रत्येक सुराचे एक विशिष्ट कंपन असते आणि ते आपल्या शरीरातील सप्तचक्र किंवा सात ऊर्जाकेंद्रांशी कसे निगडीत आहेत हे त्यांनी समजावून सांगितले. प्रत्येक सुराचा आणि त्या सप्त केंदाचा असलेला परस्पर संबंध तसेच होणारे आजार व त्यावर उपचारात्मक पद्धती याविषयी त्यांनी माहिती दिली.
योगगुरू हरिप्रसाद वर्मा आणि श्रुती बोडे यांनी सहभाग घेतला. हरिप्रसाद वर्मा यांनी संगीतातील सातसूर सप्तचक्र किंवा सात ऊर्जा केंद्र यांच्याशी निगडीत आहेत, तसेच मंत्रातील उच्चारण्याचे सप्तसूर कसे असतात याचे प्रात्यक्षिकासह वर्णन केले.
कार्यक्रमाला केएलईचे उपकुलगुरू डॉ. विवेक सावजी, जे. एन. मेडिकल कॉलेजचे उपप्राचार्य डॉ. राजेश पोवार, स्कूल ऑफ म्युझिकचे समन्वयक डॉ. राजेंद्र भांडणकर, कार्यक्रमाचे संयोजक प्रवीण शेवडे, स्कूल ऑफ म्युझिकच्या प्राचार्या स्नेहा राजुरीकर यासह इतर उपस्थित होते.