बीडीएफए चषक फुटबॉल स्पर्धा : मदनी, कॅन्टोन्मेंट संघांचे प्रतिस्पर्ध्यांवर विजय
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना आयोजित बीडीएफए चषक 17 वर्षाखालील आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून मदनी संघाने केएलएस पब्लिक संघाचा, कॅन्टोन्मेंटने संत मीराचा पराभव करून प्रत्येकी 2 गुण मिळविले. केएलएसने केएलई इंटरनॅशनलचा तर सेंट झेवियर्सने अमृता विद्यालयाचा पराभव करून बाद फेरीत प्रवेश केला.
श्रीनगर येथील लव्हडेल स्कूलच्या स्पोर्टींग प्लॅनेट्स मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात मदनी संघाने केएलएस पब्लिक संघाचा 3-0 असा पराभव केला. या सामन्यात 17 व्या मिनिटाला माज मदरसाच्या पासवर साजीद आचमनीने पहिला गोल करून आघाडी मिळवून दिली. दुसऱया सत्रात 37 व्या मिनिटाला साजिद आचमनीच्या पासवर माविया मुल्लाने दुसरा गोल केला तर 46 व्या मिनिटाला माज मदरसाने बचाव फळीला चकवत तिसरा गोल करून 3-0 असा विजय निश्चित केला.
दुसऱया सामन्यात कॅन्टोन्मेंट संघाने संत मीरा संघाचा 5-1 असा पराभव केला. या सामन्यात चौथ्या मिनिटाला कॅन्टोन्मेंटच्या माविया नायकच्या पासवर झियान बेपारीने पहिला गोल केला. 21 व्या मिनिटाला झियान बेपारीने डी बाहेरून अप्रतिम गोल करून 2-0 ची आघाडी मिळवून दिली. दुसऱया सत्रात 26 व 28 व्या मिनिटाला झियान बेपारीच्या पासवर आर्सलन रोटीवालेने सलग दोन गोल करून 4-0 ची आघाडी मिळवून दिली. 34 व्या मिनिटाला झियान बेपारीच्या पासवर माविया नायकने पाचवा गोल केला. 36 व्या मिनिटाला स्वयं काकतकरने संत मीराचा एकमेव गोल केला.
तिसऱया सामन्यात केएलएस संघाने केएलई इंटरनॅशनल संघाचा 2-0 असा पराभव केला. या सामन्यात तिसऱया मिनिटाला तन्मय पाटीलच्या पासवर साकीब जागीरदारने पहिला गोल केला. दहाव्या मिनिटाला केएलईच्या श्रीप्रसादने मारलेला वेगवान फटका केएलएसचा गोलरक्षक वेदांत पाटीलने अचूक अडविला. 14 व्या मिनिटाला तन्मय पाटीलच्या पासवर साकीब जागीरदारने दुसरा गोल करून 2-0 ची आघाडी मिळवून दिली. दुसऱया सत्रात दोन्ही संघानी गोल करण्याचे अनेक प्रयत्न केले पण त्यांना अपयश आले.
चौथ्या सामन्यात सेंट झेवियर्सने अमृता विद्यालय संघावर 8-0 असा एकतर्फी विजय मिळविला. या सामन्यात 4, 7, 36, व 45 व्या मिनिटाला अयान किल्लेदारने 4 गोल केले. 31 व 36 व्या मिनिटाला रिहान किल्लेदारने सलग 2 गोल केले, 22 व्या मिनिटाला स्पर्श देसाईने तर 38 व्या मिनिटाला माज कुडचीने प्रत्येकी 1 गोल करून अमृता विद्यालयचे आव्हान 8-0 असे संपुष्टात आणले.
शनिवारचे सामने
- सेंट मेरीज वि. संत मीरा सकाळी 10 वा.,
- सेंट पॉल्स वि. ज्ञान प्रबोधन मंदिर सकाळी 11 वा.,
- लव्हडेल वि. केएलएस पब्लिक दुपारी 12 वा.