आयपीएल : 69 चेंडूत 132 धावांची अभेद्य खेळी, पंजाब किंग्स इलेव्हनचा 97 धावांनी एकतर्फी विजय, बिश्नोई, मुरुगन अश्विनचे प्रत्येकी 3 बळी
वृत्तसंस्था / दुबई
कर्णधार केएल राहुलचा (69 चेंडूत नाबाद 132) शतकी झंझावात व अश्विन मुरुगन (3-21), रवी बिश्नोई (3-32) यांच्या भेदक माऱयानंतर किंग्स इलेव्हन पंजाबने आयपीएल साखळी सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरचा 97 धावांनी धुव्वा उडवला. प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर पंजाबने निर्धारित 20 षटकात 3 बाद 206 धावांचा डोंगर रचला तर प्रत्युत्तरात आरसीबीचा डाव 17 षटकात सर्वबाद 109 धावांमध्येच गुंडाळला गेला.
विजयासाठी 207 धावांचा पाठलाग करताना आरसीबीची पहिली 3 षटके पूर्ण होण्यापूर्वीच 3 बाद 4 अशी जबरदस्त पडझड झाली आणि यातून ते अजिबात सावरु शकले नाहीत. मागील सामन्यातील स्टार फलंदाज देवदत्त पडिक्कल (1), फिलीप (0) व विराट (1) अतिशय स्वस्तात गारद झाल्याने आरसीबीची प्रचंड पिछेहाट झाली. ऍरॉन फिंचने 21 चेंडूत 20 तर एबी डीव्हिलियर्सने 18 चेंडूत 28, वॉशिंग्टन सुंदरने 27 चेंडूत 30 धावा केल्या. मात्र, मोठी खेळी करण्यात त्यांनाही यश आले नाही. त्यानंतर त्यांचे उर्वरित फलंदाजही तोच कित्ता गिरवत स्वस्तात बाद होत राहिले.
गोलंदाजीत रवी बिश्नोईने 32 धावात 3 तर मुरुगन अश्विनने 21 धावात 3 बळी घेतले. याशिवाय, कॉट्रेलने 2 तर शमी व मॅक्सवेल यांनी प्रत्येकी 1 फलंदाज बाद केला.
राहुलची फटकेबाजी
गगनचुंबी फटकेबाजी करणाऱया केएल राहुलच्या धुवांधार नाबाद शतकामुळे किंग्स इलेव्हन पंजाबने 20 षटकात 3 बाद 206 धावांचा डोंगर रचला. कर्णधार केएल राहुलने आक्रमणाची पूर्ण धुरा आपण सांभाळत 69 चेंडूत नाबाद 132 धावांची आतषबाजी केली. त्याच्या खेळीत 14 चौकार व 7 टोलेजंग षटकारांचा समावेश राहिला. त्याच्या फटकेबाजीमुळे पंजाबने शेवटच्या 24 चेंडूत 74 धावांची आतषबाजी केली.
राहुलने अर्धशतक साजरे केल्यानंतर अधिक आक्रमणावर भर दिला आणि त्याला जोरदार यशही लाभले. आरसीबीच्या जवळपास प्रत्येक गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत त्याने सहजपणे संघाला द्विशतकी मजल गाठून दिली. सलामीला येऊन अखेरपर्यंत नाबाद राहणारा केएल राहुल या हंगामातील पहिला फलंदाज ठरला आहे. आरसीबी कर्णधार विराटने पंजाबचे हे तुफान थोपवण्यासाठी 6 गोलंदाज वापरले. पण, यातील एकही गोलंदाज यशस्वी ठरला नाही. स्पीडस्टार डेल स्टीनला तर 4 षटकातच 57 धावा मोजाव्या लागल्या.
केएल राहुलने प्रथम मयांक अगरवालसमवेत (26) व नंतर निकोलस पूरनच्या (17) साथीने दोन वेळा अर्धशतकी भागीदारी साकारली. मयांकप्रमाणेच निकोलसही फार काळ तग धरु शकला नाही. त्याला शिवम दुबेने मिडऑफवरील एबी डीव्हिलियर्सकरवी झेलबाद केले. केएल राहुलने मात्र आक्रमक फटकेबाजी कायम राखत आरसीबीच्या गोलंदाजांवर सातत्याने दडपण राखले
होते.
प्रारंभी, सावध पवित्र्याने सुरुवात करणाऱया कर्णधार केएल राहुलने चेंडूवर नजर स्थिरावल्यानंतर जोरदार फटकेबाजी सुरु केली. आरसीबीने या लढतीत नाणेफेक जिंकल्यानंतर पंजाबला प्रथम फलंदाजीला पाचारण केले होते. केएल राहुलने पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूवर आपला व संघाचा पहिला चौकार नोंदवला. डेल स्टीनला तर लागोपाठ दोन चौकार फटकावत त्याने आपले आक्रमक इरादे स्पष्ट केले.
सहकारी सलामीवीर मयांक अगरवालने यादवला षटकात दोन चौकारासाठी पिटाळत उत्तम सुरुवात केली. या उभयतांच्या फटकेबाजीमुळे पंजाबने पहिल्या 5 षटकात बिनबाद 41 अशी सुरुवात केली. नंतर फिरकीपटू चहलने डावातील 7 व्या षटकात आरसीबीला पहिले यश मिळवून देत ही जोडी फोडली. कव्हर्सच्या दिशेने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न चुकल्यानंतर मयांक येथे त्रिफळाचीत झाला.
ग्लेन मॅक्सवेलला (5) दुबेने झेलबाद केले. दुबेच्या ऑफकटरवर मॅक्सवेलचा अंदाज चुकला आणि एक्स्ट्रा कव्हरवरील फिंचने सहज झेल टिपला. त्यानंतर केएल राहुलच्या तुफानाला खऱया अर्थाने सुरुवात झाली. केएल त्याने चौफेर फटकेबाजी करत आरसीबी गोलंदाजीच्या अक्षरशः चिंधडय़ा उडवल्या. त्याच्यासाठी विराटने दिलेले जीवदान तितकेच महत्त्वाचे ठरले. विराटकडून जीवदान मिळाल्यानंतर केएल राहुलची शतकपूर्ती
झंझावाती फलंदाजी करणाऱया केएल राहुलची पहिल्या टप्प्यातील खेळी जवळपास निर्दोष स्वरुपाची राहिली. त्यानंतर त्याला 83 धावांवर असताना आरसीबी कर्णधार कोहलीकडून अनपेक्षित जीवदान लाभले. स्टीनच्या लेगस्टम्पवरील फुलटॉस चेंडूवर राहुलने स्क्वेअर बाऊन्ड्रीवर जोरदार फटका लगावला. डीप मिडविकेटवरील विराटने सोपा झेल टिपणे अपेक्षित होते. पण, विराट झेल पूर्ण करु शकला नाही आणि या संधीचा उत्तम लाभ घेत राहुलने नंतर झंझावाती शतक साजरे केले.
धावफलक
किंग्स इलेव्हन पंजाब : केएल राहुल नाबाद 132 (69 चेंडूत 14 चौकार, 7 षटकार), मयांक अगरवाल त्रि. गो. चहल 26 (20 चेंडूत 4 चौकार), निकोलस पूरन झे. डीव्हिलियर्स, गो. दुबे 17 (18 चेंडूत 1 चौकार), ग्लेन मॅक्सवेल झे. फिंच, गो. दुबे 5 (6 चेंडू), करुण नायर नाबाद 15 (8 चेंडूत 2 चौकार). अवांतर 11. एकूण 20 षटकात 3 बाद 206.
गडी बाद होण्याचा क्रम
1-57 (मयांक, 6.6), 2-114 (पूरन, 13.1), 3-128 (मॅक्सवेल, 15.2).
गोलंदाजी
उमेश यादव 3-0-35-0, डेल स्टीन 4-0-57-0, नवदीप सैनी 4-0-37-0, यजुवेंद्र चहल 4-0-25-1, वॉशिंग्टन सुंदर 2-0-13-0, शिवम दुबे 3-0-33-2.
गडी बाद होण्याचा क्रम
रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर : देवदत्त पडिक्कल झे. रवी बिश्नोई, गो. कॉट्रेल 1 (2 चेंडू), ऍरॉन फिंच त्रि. गो. रवी बिश्नोई 20 (21 चेंडूत 3 चौकार), जोश फिलीप पायचीत गो. शमी 0 (3 चेंडू), विराट कोहली झे. रवी बिश्नोई, गो. कॉट्रेल 1 (5 चेंडू), एबी डीव्हिलियर्स झे. खान, गो. अश्विन 28 (18 चेंडूत 4 चौकार, 1 षटकार), वॉशिंग्टन सुंदर झे. अगरवाल, गो. बिश्नोई 30 (27 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), शिवम दुबे त्रि. गो. मॅक्सवेल 12 (12 चेंडू), उमेश यादव त्रि. गो. बिश्नोई 0 (2 चेंडू), नवदीप सैनी त्रि. गो. मुरुगन 6 (7 चेंडूत 1 चौकार), डेल स्टीन नाबाद 1 (2 चेंडू), यजुवेंद्र चहल पायचीत गो. अश्विन 1 (3 चेंडू). अवांतर 9. एकूण 17 षटकात सर्वबाद 109.
1-2 (पडिक्कल, 0.4), 2-3 (फिलीप, 1.3), 3-4 (विराट, 2.4), 4-53 (फिंच, 7.5), 5-57 (डीव्हिलियर्स, 8.2), 6-83 (दुबे, 12.6), 7-88 (उमेश यादव, 13.6), 8-101 (वॉशिंग्टन सुंदर, 15.2), 9-106 (सैनी, 16.2), 10-109 (चहल, 16.6).
गोलंदाजी
कॉट्रेल 3-0-17-2, मोहम्मद शमी 3-0-14-1, रवी बिश्नोई 4-0-32-3, मुरुगन अश्विन 3-0-21-3, नीशम 2-0-13-0, मॅक्सवेल 2-0-10-1.