दुबई : आयसीसीने बुधवारी जाहीर केलेल्या कसोटी मानांकनात फलंदाजीमध्ये भारताच्या केएल राहुलने 18 स्थानांची प्रगती करीत 31 वे स्थान मिळविले आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या पहिल्या कसोटीत भारताने 113 धावांनी विजय मिळविला होता, त्यात केएल राहुलने शतकी खेळी करीत सामनावीराचा बहुमानही मिळविला होता. या कामगिरीचा त्याला मानांकनात बढती मिळण्यासाठी फायदा झाला आहे. नोव्हेंबर 2017 मध्ये त्याने या क्रमवारीत आठव्या स्थानापर्यंत मजल मारली होती आणि हेच त्याचे आजवरचे सर्वोच्च मानांकन ठरले आहे. पहिल्या कसोटीत त्याने 123 धावा जमविताना मयांक अगरवालसमवेत 117 धावांची सलामीची भागीदारी केली होती. 60 धावा करणाऱया अगरवालनेही एका स्थानाची प्रगती केली असून अजिंक्य रहाणेने दोन क्रम पुढे सरकत 25 वे स्थान मिळविले आहे.