वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय फलंदाज केएल राहुलला विंडीजविरुद्ध होणाऱया टी-20 मालिकेला कोरोनामुळे मुकावे लागणार आहे.
भारतीय संघ सध्या वनडे मालिका खेळत असून त्यानंतर टी-20 मालिकेतील पहिला सामना 29 जुलैला होणार आहे. 7 ऑगस्टला शेवटचा सामना होईल. गेल्या आठवडय़ात बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी केएल राहुलला कोरोनाची लागण झाली असल्याचे आयसीसी बैठक झाल्यानंतर सांगितले होते. त्याचा आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झाला असला तरी पूर्णपणे सावरण्यासाठी बीसीसीआयच्या मेडिकल पथकाने त्याला आणखी एक आठवडा विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.
अलीकडेच त्याच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्याने बेंगळूरमधील क्रिकेट अकादमीत सरावाला सुरुवात केली होती. त्याची विंडीजविरुद्ध टी-20 मालिकेसाठी निवडही करण्यात आली आणि त्याची दोन दिवस आधी फिटनेस चाचणी घेतली जाणार होती. भारताचा टी-20 संघ मंगळवारी त्रिनिदादमध्ये दाखल झाला आहे.