मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्या हस्ते शुभारंभ : परिवहनच्या उत्पन्नात पडणार भर
प्रतिनिधी / बेंगळूर
राज्य रस्ते परिवहन महामंडळातर्फे (केएसआरटीसी) प्रथमच पार्सल कार्गो सेवा आणि किडवाई, रोटरी संस्थेच्या मदतीने फिरत्या रक्तदान सेवेच्या बसचे लोकार्पण करण्यात आले आहे. मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी कार्गो सेवेचा शुभारंभ केला. कोरोना परिस्थितीमुळे राज्याची परिवहन संस्था संकटात आहे. त्यावर तोडगा म्हणून उत्पन्न वाढीसाठी कुरियर सेवा सुरू करणे योग्य असल्याचे मत येडियुराप्पा यांनी यावेळी व्यक्त केले.
राज्यात केएसआरटीसी, वायव्य व ईशान्य परिवहन निगमच्या बसेस दररोज 51 लाख कि. मी. अंतर धावतात. 38 लाख प्रवाशांची वाहतूक होते. अलिकडे उत्पन्नासाठी प्रवासी वाहतुकीबरोबरच अन्य पर्यायी मार्गांचाही अवलंब करणे आवश्यक आहे. त्याकरिता सुरू करण्यात आलेली पार्सल व कार्गो सेवा फायदेशीर आहे. नागरिकांनाही याचा लाभ होईल, असे ते म्हणाले.
राज्यासह आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, गोवा, केरळ व तामिळनाडू राज्यांसाठी कार्गो सेवा उपलब्ध असेल. यातून केएसआरटीसीला वार्षिक 80 कोटींचे उत्पन्न मिळेल. राज्यातील 88 तालुका बसस्थानके व 21 आंतरराज्य बसस्थानकांवर ही सेवा उपलब्ध असणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
रक्तदानासाठी एसी बस केएसआरटीसीच्या जुन्या एसी बसेस किडवाई कॅन्सर हॉस्पिटलला मोफत देण्यात आल्या आहेत. सुरुवातीला या बसेसचा कॅन्सरचे निदान करण्यासाठी वापरण्यात येतील. रोटरी संस्थेनेही अशा बसेसमध्ये रक्तदान करणाऱयांसाठी व्यवस्था केली आहे.