बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक राज्य रस्ता परिवहन महामंडळाने (केएसआरटीसी) बुधवारी दीपावली उत्सवाच्या आधी तामिळनाडूसाठी पुन्हा बस सेवा सुरू केली. राज्य परिवहन महामंडळाने यापूर्वी कोरोना आणि लॉकडाऊनमुळे आंतरराज्य बस सेवा बंद केल्या होत्या. तामिळनाडू सरकारने ११ ते १६ नोव्हेंबर या कालावधीत कर्नाटकातून आंतरराज्य बस सेवांना ई-नोंदणीविना सहा दिवस परवानगी देण्याचा आदेश दिल्यानंतर या सेवा सुरू झाल्या.
केएसआरटीसीचे पीआरओ टी. एस. लता यांनी केएसआरटीसीने तामिळनाडू सरकारला आंतरराज्यीय बस सेवा सुरु करण्यासाठी परवानगी देण्याची विनंती केली होती आणि बुधवारी तामिळनाडूच्या मुख्य सचिवांनी परवानगी दिली, म्हणून केएसआरटीसी तातडीने आपली बस सेवा पुन्हा सुरू करीत आहे, अशी माहिती दिली.