क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
हुबळी येथे कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यता प्राप्त धारवाड विभागीय क्रिकेट संघटना आयोजित केएससीए थर्ड डिव्हिजन क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात तेजल शिरगुप्पी क्रिकेट अकादमी हुबळी संघाने हुबळी स्पोर्टस् क्लब सी संघाचा 75 धावांनी पराभव करून केएससीए थर्ड डिव्हिजन क्रिकेट स्पर्धेत अजिंक्यपद पटकाविले. 87 धावा करणाऱया प्रल्हाद नाईकला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
हुबळी येथील केएससीए मैदानावर अंतिम सामन्यात तेजल शिरगुप्पी संघाने प्रथम फलंदाजी करताना 28.5 षटकात सर्वबाद 177 धावा केल्या. प्रल्हाद नाईकने 2 षटकार, 9 चौकारासह 87, आदित्य उप्पीनने 2 चौकारासह 19, नवीन गडदिनीने 2 चौकारासह 17, तर राजाराम वैद्यने 10 धावा केल्या. हुबळी स्पोर्टसतर्फे वरुण एम.ने 18 धावात 3, कार्तिककुमारने 29 धावात 2, इस्माईल पी. ए. ने 30 धावात 2 तर संकेत शेट्टी व समर्थ व्ही. बी. यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल हुबळी स्पोर्टस् क्लब सी संघाचा डाव 30 षटकात सर्वबाद 102 धावांत आटोपला. आयुष्य पाटील 1 षटकार, 4 चौकारासह 43, वरुण एम. व इस्माईल पी. ए. यांनी प्रत्येकी 16 धावा केल्या. तेजल शिरगुप्पी संघातर्फे राजाराम वैद्यने 17 धावांत 3, नवीन गडदिनीने 21 धावात 3, रामानंद संगबाल व श्रीयोगी मुडीगौडर यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.