आयपीएल साखळी सामन्यात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 3 गडी राखून मात
शारजाह / वृत्तसंस्था
धावांचा पाठलाग करताना नितीश राणाने संयमी खेळीवर भर दिल्यानंतर केकेआरने आयपीएल साखळी सामन्यात दिल्ली कॅपिटल्सवर 3 गडी राखून मात केली आणि या लो स्कोअरिंग एन्काऊंटरमध्ये यश प्राप्त केले. प्रारंभी, दिल्लीने निर्धारित 20 षटकात केवळ 9 बाद 129 धावा केल्या तर प्रत्युत्तरात केकेआरने 18.2 षटकात 7 गडय़ांच्या बदल्यात विजयाचे लक्ष्य गाठले. शारजाहच्या संथ खेळपट्टीवर केकेआरच्या गोलंदाजांचा मारा निर्णायक ठरला.
टी-20 स्पेशालिस्ट राणा (नाबाद 36) व अनुभवी सुनील नरेन (10 चेंडूत 21) यांच्या फटकेबाजीमुळे हा सामना केकेआरच्या बाजूने झुकला. या उभयतांनी अननुभवी ललित यादवच्या डावातील 14 व्या षटकात चढवलेला हल्ला निर्णायक ठरला. याच दोघांनी पुढे 16 व्या षटकात अनुभवी रबाडाचा घेतलेला समाचार देखील लक्षवेधी ठरला.
सध्या गुणतालिकेत दुसऱया स्थानी विराजमान असलेल्या दिल्लीसाठी हा पराभवाचा झटका एखाद्या वेकअप कॉलसारखा आहे. दिल्लीच्या खात्यावर 16 गुण आहेत तर केकेआरने 10 गुण संपादन केले आहेत.
शारजाहच्या ट्रकवर धावा जमवणे कठीण होते. याचा लाभ घेत दिल्लीने 13 व्या षटकापर्यंत केकेआरला 4 बाद 76 असे रोखून धरले होते. मात्र, रिषभ पंतने तोवर रविचंद्रन अश्विनचा 4 षटकांचा कोटा संपवला होता आणि या परिस्थितीत त्याच्याकडे ललित यादवच्या ऑफ ब्रेक गोलंदाजीवर अवलंबून राहण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. ललितला पाचारण करताच केकेआरच्या फलंदाजांनी त्याच्या गोलंदाजीवर तुटून पडण्याचा सिलसिलाच सुरु केला. राणाने 2 उत्तूंग षटकार खेचल्यानंतर ललितच्या एकाच षटकात 20 धावांची आतषबाजी झाली.
त्यानंतर 16 व्या षटकात नरेनने रबाडाच्या गोलंदाजीवर हल्ला चढवला आणि या षटकात आणखी 21 धावांची बरसात झाली. यामुळे पाहता पाहता हा सामना केकेआरच्या बाजूने झुकला. राणाने नंतर ऍनरिच नोर्त्झेला चौकार फटकावत थाटात विजयावर शिक्कामोर्तब करुन दिले.
तत्पूर्वी, केकेआरच्या गोलंदाजांनी कर्णधार मॉर्गनचा दिल्लीला प्रथम फलंदाजीला पाचारण करण्याचा निर्णय सार्थ ठरवला. दिल्लीतर्फे केवळ स्टीव्ह स्मिथ (39) व कर्णधार रिषभ पंत (39) यांनाच 30 धावांचा मार्क सर करता आला. दिल्लीच्या पूर्ण डावात एकही षटकार फटकावला गेला नाही.
धावफलक
दिल्ली कॅपिटल्स ः स्टीव्ह स्मिथ त्रि. गो. फर्ग्युसन 39 (34 चेंडूत 4 चौकार), शिखर धवन झे. अय्यर, गो. फर्ग्युसन 24 (20 चेंडूत 5 चौकार), श्रेयस अय्यर त्रि. गो. नरेन 1 (5 चेंडू), रिषभ पंत धावचीत (करुण नायर-कार्तिक) 39 (36 चेंडूत 3 चौकार), शिमरॉन हेतमेयर झे. साऊदी, गो. अय्यर 4 (5 चेंडू), ललित यादव पायचीत गो. नरेन 0 (3 चेंडू), अक्षर पटेल झे. फर्ग्युसन, गो. अय्यर 0 (5 चेंडू), रविचंद्रन अश्विन झे. राणा, गो. साऊदी 9 (8 चेंडूत 1 चौकार), कॅगिसो रबाडा नाबाद 0 (1 चेंडू), अवेश खान धावचीत (कार्तिक) 5 (3 चेंडूत 1 चौकार). अवांतर 6. एकूण 20 षटकात 9 बाद 129.
गडी बाद होण्याचा क्रम ः 1-35 (धवन, 4.6), 2-40 (अय्यर, 6.2), 3-77 (स्मिथ, 12.2), 4-88 (हेतमेयर, 13.5), 5-89 (ललित, 14.3), 6-92 (अक्षर, 15.3), 7-120 (अश्विन, 19.1), 8-122 (रिषभ, 19.2), 9-127 (अवेश, 19.6).
गोलंदाजी ः संदीप वॉरियर 2-0-15-0, टीम साऊदी 4-0-29-1, लॉकी फर्ग्युसन 2-0-10-2, वरुण चक्रवर्ती 4-02-24-0, सुनील नरेन 4-0-18-2, वेंकटेश अय्यर 4-0-29-2.
कोलकाता नाईट रायडर्स ः शुभमन गिल झे. अय्यर, गो. रबाडा 30 (33 चेंडूत 1 चौकार, 2 षटकार), वेंकटेश अय्यर त्रि. गो. ललित यादव 14 (15 चेंडूत 2 चौकार), राहुल त्रिपाठी झे. स्मिथ, गो. अवेश खान 9 (5 चेंडूत 1 षटकार), नितीश राणा नाबाद 36 (27 चेंडूत 2 चौकार, 2 षटकार), इयॉन मॉर्गन झे. ललित यादव, गो. अश्विन 0 (2 चेंडू), दिनेश कार्तिक त्रि. गो. अवेश खान 12 (14 चेंडूत 2 चौकार), सुनील नरेन झे. पटेल, गो. नोर्त्झे 21 (10 चेंडूत 1 चौकार, 2 षटकार), टीम साऊदी त्रि. गो. अवेश खान 3 (5 चेंडू), लॉकी फर्ग्युसन नाबाद 0 (0 चेंडू). अवांतर 5. एकूण 18.2 षटकात 7 बाद 130.
गडी बाद होण्याचा क्रम ः 1-28 (वेंकटेश अय्यर, 4.3), 2-43 (राहुल त्रिपाठी, 5.5), 3-67 (शुभमन, 10.6), 4-67 (मॉर्गन, 11.2), 5-96 (दिनेश कार्तिक, 14.4), 6-122 (नरेन, 16.5), 7-126 (टीम साऊदी, 17.6).
गोलंदाजी ः ऍनरिच नोर्त्झे 2.2-0-15-1, अक्षर पटेल 3-0-13-0, रविचंद्रन अश्विन 4-0-24-1, ललित यादव 3-0-35-1, अवेश खान 3-0-13-3, रबाडा 3-1-28-1.
रिषभ पंतची आगळीक आणि क्षणभर दिनेश कार्तिकही भांबावला!
वरुणच्या डावातील 17 व्या षटकात पहिल्या चेंडूवर रिषभ पंतने ऑफसाईडकडे ड्राईव्हचा प्रयत्न केला, त्यावेळी चेंडू आदळून पुन्हा स्टम्पवर येण्याची किंचीत शक्यता होती. ते टाळण्यासाठी रिषभ पंतने बॅटने चेंडू फटकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, या प्रयत्नात त्याची बॅट कार्तिकच्या हेल्मेटवर आदळण्याची बरीच शक्यता होती. स्वतः कार्तिकही यावेळी क्षणभर भांबावून गेला होता. त्याने आधीच मागे होत स्वतःचा बचाव केला. नंतर पंतने कार्तिकची माफीही मागितली.