चेन्नई सुपरकिंग्सविरुद्ध पराभव स्वीकारावा लागल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सला प्ले-ऑफमधील स्थान निश्चित करण्यासाठी खूपच खडतर परिश्रम करावे लागतील, असे स्पष्ट झाले आहे आणि यामुळे या संघाचा मार्गदर्शक डेव्हिड हसी बराच नाराज आहे. केकेआरच्या गोलंदाजांना चेन्नईविरुद्ध 172 धावांचे संरक्षण करता आले नव्हते. या लढतीत त्यांना 6 गडय़ांनी पराभव स्वीकारावा लागला आणि हाच पराभव त्यांना मोक्याच्या क्षणी महागडा ठरु शकतो.
या निकालामुळे केकेआरचा संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानी कायम राहिला आणि त्यांच्या खात्यावर 13 सामन्यात 12 गुण कायम राहिले. आता प्ले-ऑफमधील स्थान निश्चित करण्यासाठी त्यांना शेवटचा सामना बडय़ा फरकाने जिंकावा लागेलच. शिवाय, अन्य सामन्यांमधून अनुकूल निकाल येईल, अशीही अपेक्षा करावी लागेल.
‘चेन्नईविरुद्ध पराभवामुळे जर-तरची नवी समीकरणे आम्हाला झेलावी लागतील. wपण. या पराभवामुळेच ही समस्या निर्माण झाली आहे. येथे विजय संपादन केला असता तर वेगळे चित्र असते. अर्थात, जे चित्र समोर आहे, ते स्वीकारुन आमचा संघ ताज्या दमाने आव्हान स्वीकारण्यास सज्ज असेल. शेवटच्या सामन्यात विजय संपादन केल्यानंतर अन्य अनुकूल निकाल हाताशी असतील व प्ले-ऑफमध्ये आम्ही धक्कादायक निकाल नोंदवत प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारु’, असा विश्वास हसीने येथे व्यक्त केला.