केकेआरला फलंदाजीची मुख्य चिंता, शुभमन गिल खराब फॉर्ममध्ये
अहमदाबाद / वृत्तसंस्था
एकापेक्षा एक स्टार खेळाडूंचा समावेश असलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध आज (दि. 29) आयपीएल साखळी सामन्यात केकेआरच्या खराब फलंदाजीची कसून परीक्षा होऊ शकते. केकेआरचा सलामीवीर शुभमन गिल (6 सामन्यात 89 धावा) खराब फॉर्ममध्ये असून तेथूनच या संघाच्या अडचणींना सुरुवात होते. त्याचा लाभ घेण्याचा दिल्लीचा प्रयत्न असेल. उभय संघातील ही लढत सायंकाळी 7.30 पासून सुरु होईल.
मास्टर-अप्रेन्टिस सुनील नरेन व वरुण चक्रवर्ती यांच्यामुळे केकेआरची फिरकी गोलंदाजी मात्र मजबूत आहे. या उभयतांनी प्रतिस्पर्ध्यांना रोखण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. केकेआरच्या आघाडी फलंदाजांचा खराब फॉर्म मात्र चिंतेचे मुख्य कारण आहे.
यापूर्वी पंजाब किंग्सविरुद्ध मागील सामन्यात 124 धावांच्या तुलनेने किरकोळ आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरची 3 बाद 17 अशी दाणादाण उडाली होती, यावरुनच त्यांच्या आघाडीवीरांच्या खराब फॉर्मची कल्पना येईल. नंतर केवळ कर्णधार इयॉन मॉर्गनच्या संयमी फलंदाजीमुळे केकेआरला विजयावर शिक्कामोर्तब करता आले. केकेआरने त्यावेळी सलग 4 पराभवांची मालिका खंडित केली होती.
दिल्लीची फलंदाजी स्पर्धेतील ऑरेंज कॅपचा मानकरी शिखर धवन (265 धावा), पृथ्वी शॉ, स्टीव्ह स्मिथ, धोकादायक रिषभ पंत यांच्यामुळे मजबूत आहे. साहजिकच, केकेआरला फलंदाजीतील त्रुटी दूर करण्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल. शुभमन गिलला अनुक्रमे 15, 33, 21, 0, 11 व 9 अशा किरकोळ धावांवर समाधान मानावे लागले असून तो बहरात येणे या संघासाठी विशेष महत्त्वाचे असेल. ज्येष्ठ समालोचक सुनील गावसकर यांनी सुचवल्याप्रमाणे राहुल त्रिपाठीसह सुनील नरेनला सलामीला बढती देऊन गिलला खाली खेळवण्याचा पर्याय अमलात आणता येईल. मॉर्गन, आंद्रे रसेल व दिनेश कार्तिक यांना सूर सापडला तर या संघाला रोखणे अर्थातच कठीण ठरु शकते.
रविचंद्रन अश्विनने स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर संधी मिळालेल्या इशांत शर्माने यापूर्वीच्या लढतीत भेदक मारा साकारला. त्यामुळे, दिल्लीला गोलंदाजीच्या आघाडीवर देखील निश्ंिचती लाभलेली आहे.
प्रतिस्पर्धी संघ
दिल्ली कॅपिटल्स ः रिषभ पंत (कर्णधार-यष्टीरक्षक), शिखर धवन, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, शिमरॉन हेतमेयर, मार्कस स्टोईनिस, ख्रिस वोक्स, शॅम्स मुलाणी, अमित मिश्रा, ललित यादव, प्रवीण दुबे, कॅगिसो रबाडा, ऍनरिच नोर्त्झे, इशांत शर्मा, अवेश खान, स्टीव्ह स्मिथ, उमेश यादव, रिपल पटेल, विष्णू विनोद, लुकमन मेरिवाला, एम. सिद्धार्थ, टॉम करण, सॅम बिलिंग्ज, अनिरुद्ध जोशी.
केकेआर ः इयॉन मॉर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक, शुभमन गिल, नितीश राणा, टीम सेफर्ट, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, कुलदीप यादव, शिवम मावी, लॉकी फर्ग्युसन, पॅट कमिन्स, कमलेश नागरकोटी, संदीप वॉरियर, प्रसिद्ध कृष्णा, राहुल त्रिपाठी, वरुण चक्रवर्ती, शकीब अल हसन, शेल्डॉन जॅक्सन, वैभव अरोरा, हरभजन सिंग, करुण नायर, बेन कटिंग, वेंकटेश अय्यर, पवन नेगी.
सामन्याची वेळ ः सायं. 7.30 पासून.
आंद्रे रसेल-शिमरॉन हेतमेयर यांच्यात ‘मिनी कॅरेबियन बॅटल’
आजच्या लढतीत आंद्रे रसेल व शिमरॉन हेतमेयर या कॅरेबियन खेळाडूत देखील मिनी बॅटल रंगू शकते. यापूर्वी कॅपिटल्सतर्पे हेतमेयरने आरसीबीविरुद्ध झंझावाती खेळी साकारत संघाला विजयाच्या उंबरठय़ावर आणलेच होते. पण, शेवटच्या चेंडूवर त्यांना पराभव पत्करावा लागला. दुसरीकडे, रसेलने चेन्नईच्या गोलंदाजांचा अगदी यथोचित समाचार घेत 22 चेंडूत 54 धावांची आतषबाजी केली. पण, तो ही संघाला विजय मिळवून देऊ शकला नव्हता. आज हे दोन्ही कॅरेबियन खेळाडू फिनिशिंगवर अधिक मेहनत घेऊ शकतील.