मंत्री मायकल लोबो यांची माहिती, दिल्ली जीएसटी हब असल्याने ते शक्य
प्रतिनिधी /म्हापसा
राज्यात कोविड महामारीमुळे बेरोजगारी वाढलेली आहे. भारतीय व विदेशी पर्यटक राज्यात येणार तेव्हा आर्थिक व्यवसाय सुरू होईल. केजरीवाल यांनी दिल्ली येथे विविध सोयी सुविधा दिल्या असल्या तरी ते गोव्यात शक्य नाही. जीएसटी दिल्लीची हब आहे. राज्यात खाणी व पर्यटन व्यवसाय सुरू झाल्यास सरकारला महसूल मिळू शकतो. केजरीवाल यांनी रोजगाराचा वर्षाव केला असला तरी गोव्यात ते कदापी शक्य नाही, अशी माहिती कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांनी आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सरपंच डिलायला लोबो, हडफडे सरपंच राजेश मोरजकर, कांदोळी ब्लेझ मिनेझीस, काणका सरपंच अमिता कोरगांवकर, नितीन लिंगुडकर, आनंद सावळ आदी मान्यवर उपस्थित होते.
निवडणूक जवळ आली की अनेक जण जागे होतात. कळंगुटमध्ये सलग 3 वेळा अद्याप कुणीही निवडून आलेला नाही. आपला पाडाव कसा होईल याकडे सर्वजण पाहत आहेत. मात्र हे लोकांवर अवलंबून आहे. म्हापसा, शिवोली, पर्वरी येथील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. सरकार म्हणून ही आमची जबाबदारी आहे. ही कामे व्हायला पाहिजेत, असे लोबो म्हणाले.
रिकीनी मांद्रेकरांना पाठिंबा दिल्यास काही फरक नाही
रिकी एक चांगले व्यावसायिक आहेत. त्यांना वैयक्तिक राजकारणात यायचे असेल तर त्यांना रोखणार नाही. त्यांच्या विरोधात आपण काहीही बोलत नाही. शिवोलीत माजी मंत्री दयानंद मांद्रेकरांना पाठिंबा दिला तरी काही फरक पडत नाही. आम्ही विकास करतो म्हणून लोक आम्हाला मते देतात, असे त्यांनी सांगितले.
पर्रीकरांच्या निधनानंतर काही कामे अपुरी राहिली
मनोहर पर्रीकर आजारी पडल्यापासून ते आजपर्यंत काही कामे अपुरी राहिली. अपुऱया राहिलेल्या कामांबाबत पत्रव्यवहार करणे आवश्यक असून तो आपण करीत असल्याचे लोबो यांनी सांगितले.
आमच्या पाठिशी जनता राहील
निवडणूक रिंगणात कोणीही उतरू शकतात. शिवोलीत सावियो आल्मेदा जरी इच्छुक असले तरी लोकहितार्थ आम्ही घरी जाऊन त्यांना आम्हाल एक संधी देण्याची विनंती करणार आहोत. शिवोली मतदारसंघ इतकी वर्षे मागे राहिला आहे तेथे आम्ही चौफेर विकास करू पाहतो. आमच्या पाठिशी लोक उभे राहणार आहेत.
फडणवीस यांनी संपूर्ण राज्याचा आढावा घेतला
भाजपा गोवा राज्य प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी काल आमच्या घरी येऊन थेट भेट घेतली असली तरी आमची भेट राजकीय स्वरुपाची होती. संपूर्ण राज्याचा आढावा त्यांनी जाणून घेतला.
निवडणुकीच्या काळात अनेक पक्ष जीवंत होतात
आता राज्यात तृणमूल काँग्रेस पक्ष येत असल्याची सर्वत्र चर्चा आहे. पूर्वी सेव्ह गोवा, युनायटेड गोवन, युजीडीपी, गोवन पक्ष असे अनेक पक्ष आहेत. आता कुणाला तिकीट मिळत नाही ते हे पक्ष घेऊन रिंगणात उतरतील. कुणाला मते द्यावी हे जनताच ठरवणार आहे, असे लोबा यांनी सांगितले.
राज्यात आम्ही विकास करीत आल्याने राज्यातील जनता आमच्याबरोबर राहणार आहे. विशेषतः आज बेरोजगारी मोठय़ा प्रमाणात वाढलेली असून युवा वर्गाला सक्षम करण्यावर भर देणार. सर्वांना सरकारी नोकरी मिळणे अशक्य आहे. युर्वावर्गांने स्वतःचा व्यवसाय सुरू करावा. बेरोजगारी हा प्रश्न या सरकारसमोर मोठे आव्हान आहे, असे लोबो म्हणाले.
बार्देशचे मंत्री म्हणून किती मतदारसंघात दावा करणार असे विचारल्यावर, बार्देश व बार्देशाबाहेर आपल्या पक्षासाठी प्रचार करून अधिकाधिक जागा जिंकून आणण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. कौटुंबिक विकास व मतदारसंघाचा विकास यावर प्रचार कार्यात भर देणार आहोत. दक्षिण गोव्यात नोव्हेंबरपर्यंत कचरा प्रकल्प पूर्ण होईल, अशी माहिती त्यांनी दिली.
आपल्या बाबतचा अभ्यास करून पूर्ण माहिती प्रभारी केंद्रात पोचविणार
देवेंद्र फडणवीस भाजपचे वरिष्ठ आणि अनुभवी नेते आहेत. पूर्ण माहितीनुसार त्यांनी अभ्यास करण्यास सुरुवात केलेली आहे. डिलायला बाबत काय करायचे याचा अहवाल ते केंद्रात योग्यरीत्या पोचविणार आहेत. त्यांना काय समजले त्याबाबतची माहिती आपल्यास सांगण्यासाठी ते आले होते. आम्ही त्यावर भाष्य करू शकत नाही. प्रदेशाध्यक्ष त्यावर बोलू शकतात अशी माहिती कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.