प्रतिनिधी /पणजी
दिल्ली आणि गोव्याच्या वीजमंत्र्यांमध्ये वीज प्रश्नावरून वादंग झाल्यानंतर आता दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांमध्ये एकमेकांवर कुरघोडी करणारा ट्विटर वाद सुरू झाला आहे. दिल्ली मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजप आमदारांवर खरेदी-विक्रीचा ठपका ठेवला आहे.
भाजपकडे भाऊसाहेब बांदोडकरांची महानता नाही. जॅक सिक्वेरांची प्रामाणिकता नाही व मनोहर पर्रीकरांचा दूरदृष्टीपणाही नसल्याची टीका ट्विटरवरून केजवाल यांनी नोंदवली आहे. काँग्रेसच्या आमदारांना भाजपने ’होलसेल’ भावाने विकत घेतल्याचा आरोपही केजरीवाल यांनी केला आहे. भाजपच्या या कृतीमुळे बांदोडकर, सिक्वेरा तसेच पर्रीकर यांचा मोठा अपमान झाल्याचे केजरीवाल यांनी म्हटले आहे.
केजरीवाल यांचे ट्विटर म्हणजे गोव्यातील नेत्यांचा मोठा अपमान असून तो आपण कदापी सहन करणार नाही असा इशारा डॉ. सावंत यांनी ट्विटरमधून दिला आहे. गोव्यातील भाजपचे नेते हे तळागाळातून वर आलेले आहेत. ते प्रामाणिक असल्याचा दावा डॉ. सावंत यांनी ट्विटरवर केला आहे. गोव्यात येऊन तुम्ही तुमचा पक्ष इतर पक्ष नेत्यांशी खलबते करीत आहेत. काँग्रेससह काही राजकारणी तुमच्या पक्षात सामील झाले आहेत ते राजकारणी थर्डक्लास आहेत काय? हा ट्विटर वाद यापुढेही चालू रहाणार अशी चिन्हे दिसत आहेत.