संजीव खाडे/कोल्हापूर
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (केडीसीसी) निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या प्रयोगानंतर बदलेले जिल्हÎातील राजकारण, पूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादीत असणाऱया नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश यामुळे केडीसीसीच्या आगामी निवडणुकीत प्रस्थापित सत्ताधारी नेत्यांना विरोधाला सामोरे जावे लागणार अशी राजकीय स्थिती निर्माण होऊ लागली आहे. त्यातून महाविकास आघाडी (काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना) विरूद्ध भाजप असा सामना रंगणार हे स्पष्ट झाले आहे. प्रभावशाली सत्ताधाऱयांच्या विरोधात मोट बांधण्याची व्यूहरचनाही विरोधकांकडून सुरू झाली आहे.
जिल्हÎाच्या राजकारण आणि सहकारावर वर्चस्व गाजवयाचे असेल तर त्यासाठी जिल्हा बँकेवरील सत्ता निर्णायक ठरते. बँकेच्या माध्यमातून कर्ज पुरवठा असो व इतर उपक्रम, योजनाच्या माध्यमातून जिल्हÎाच्या राजकारणाची सूत्रे स्वतः जवळ ठेवता येतात. या अनुभवातून केडीडीसीवरील सत्ता आणि राजकारणावर सर्व राजकीय पक्ष, नेत्यांची नजर असते. या बँकेच्या निवडणुकीच्या इतिहासात पक्षांपेक्षा प्रत्येक तालुक्यातील बडÎा नेत्यांचे अथवा त्यांच्या नातेवाईकांचे वर्चस्व राहिले आहे. आमदार, खासदार, मंत्री, पक्षप्रमुखपद भूषवत असलेली किंवा भूषविलेली राजकीय मंडळी नेहमीच संचालकपदी राहिली आहेत. त्यातून प्रस्थापित सत्ताधारी मंडळीचा चमू तयार झाला आहे. पक्षीय विचारधारा, पक्षीय अभिनिवेश बाजू ठेवून राजकारणातील इंटरेस्ट, सोय आणि सत्ता यासाठी राजकीय नेत्यांनी आजवर निवडणुका लढविल्या आणि जिंकल्या. त्यातून केडीसीसीवर वर्चस्व असणारी तालुकानिहाय राजकीय घराणीही प्रबळ झाली. या घरण्यांभोवतीच केडीसीसीचे राजकारण फिरत असल्याचे दिसते.
महाविकास आघाडीच्या प्रयोगानंतर राजकीय समिकरणे बदलली
राज्यात महाविकास आघाडीच्या प्रयोगामुळे काँगेस, राष्ट्रवादी, शिवसेना एकत्रित आले आहेत. तर भाजप विरोधी पक्ष बनला आहे. त्याचे परिणाम जिल्हÎातील राजकारणावरही झाले आहेत. पूर्वी राष्ट्रवादीत असणारे माजी खासदार धनंजय महाडिक भाजपवासी झाले आहेत. त्यांचे चुलते माजी आमदार महादेवराव महाडिक भाजपचे सर्पोटर आहेत. काँग्रेसपासून दूर जात अपक्ष निवडणूक लढवून आमदार झालेले माजी मंत्री प्रकाश आवाडे भाजप सोबत आहेत. जनुराज्य शक्ती पक्षाचे सर्वेसर्वा माजी मंत्री आमदार डॉ. विनय कोरे यांची भूमिका सध्या भाजपबरोबर जाण्याची दिसते. शाहू उद्योगाचे प्रमुख समरजितसिंह घाटगे भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत. काँग्रेसवर नाराज होऊन भाजपमध्ये गेलेले शिराळचे केडीसीसीचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव नाईक-निंबाळकर ही सारी मंडळी विरोधी भाजपच्या आघाडीत असणार हे जवळपास स्पष्ट आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विरोधी आघाडीची मोट बांधण्याची जबाबदारी ज्येष्ठ असणाऱया प्रकाश आवाडे यांच्याबरोबर धनंजय महाडिक, समरजितसिंह घाटगे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. सहकारातील या तिघांचा असणारा अनुभव यातून विरोधकांचे आव्हान निर्माण करण्याच्या हालचाली सुरू आहेत.
मुश्रीफ, सतेज पाटील यांना होणार विरोध
सध्या केडीसीसीवर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची सत्ता आहेत. त्यांच्या साथीला पालकमंत्री सतेज पाटील आहेत. गेल्यावेळी निवडणुकीत महादेवराव महाडिक, आमदार पी. एन. पाटील यांच्यासह मुश्रीफ, सतेज पाटील एकत्रित हेते. पण राजकीय संदर्भत बदलल्याने निवडणुकीचेही संदर्भ बदलले आहेत. त्यातून एकेकाळी एकत्रित लढलेले आता एकमेकांविरोधात लढताना दिसणार आहेत. सत्ताधाऱयांचे नेतृत्व अर्थातच हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील करणार हे स्पष्ट आहे. या दोन दिग्गजांच्या विरोधात आवाडे, महाडिक, घाटगे कशी मोट बांधतात?, चंद्रकांतदादा पाटील त्यांना किती पाठबळ देतात यावर विरोधकांचा कस लागणार आहे. घोडे, मैदान जवळ आहे, दोन्हीकडील उमेदवारांच्या नावांची चर्चाही सुरू झाली आहे. त्यातून राजकीय व्यूहरचना, डावपेचांचा आखणीही सुरू झाली आहे.
पी. एन. पाटील आणि विनय कोरे यांच्याकडे लक्ष
महाविकास आघाडीतील काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील गोकुळच्या निवडणुकीत महाडिक यांच्याबरोबर तर सतेज पाटील, हसन मुश्रीफ यांच्या विरोधात होते. त्यामुळे केडीसीसीच्या निवडणुकीत त्यांच्या भूमिकेकडे लक्ष असणार आहे. त्याचप्रमाणे आमदार डॉ. विनय कोरे हे गोकुळ निवडणुकीत सतेज पाटील, हसन मुश्रीफ यांच्याबरोबर होते. पण केडीसीसीच्या निवडणुकीत ते भाजपबरोबर असणार आहेत.
महापालिकेच्या राजकारणासाठी प्रा. जयंत पाटील यांना संधी?
माजी नगरसेवक प्रा. जयंत पाटील यांना केडीसीसीच्या निवडणुकीत विरोधी भाजप आघाडीकडून संधी देण्याच्या हालचाली सुरू आहेत. केडीसीसीसह कोल्हापूर महापालिकेच्या आगामी निवडणुकीत त्यांच्या अनुभवाचा फायदा घेण्यासाठी त्यांना संधी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
केडीसीसी बँकेचे विद्यमान संचालक मंडळ
हसन मुश्रीफ, अध्यक्ष, विनायक उर्फ अप्पी पाटील (उपाध्यक्ष 30 सप्टेंबर 2019 पर्यंत), संचालक ः आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संजय मंडलिक, आमदार पी. एन. पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक, आमदार डॉ. विनय कोरे, आमदार राजूबाबा आवळे, आमदार राजेश पाटील, माजी खासदार निवेदिता माने, पी. जी. शिंदे, अशोक चराटी, विलासराव गाताडे, अनिल पाटील, प्रताप उर्फ भैय्या माने, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, सर्जेराव पाटील-पेरीडकर, संतोष पाटील, रणजितसिंह पाटील, अर्चना पाटील, उदयानीदेवी साळुंखे, तज्ञ संचालक ः असिफ फरास, आर. के. पोवार.