नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉ. यशवंतराव थोरात यांच्या हस्ते व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली होणार कार्यक्रम
कोल्हापूर / प्रतिनिधी:
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मोबाइल बँकिंग सुविधा व अद्ययावत वेबसाईटचा शुभारंभ शुक्रवारी (1 मे ) रोजी होणार आहे. नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉ . यशवंतराव थोरात यांच्या हस्ते व ग्रामविकास मंत्री तसेच बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली बँकेच्या प्रधान कार्यालयात सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांनी ही माहिती दिली आहे.
बँकेच्या ग्राहकांना अत्याधुनिक सुविधा देण्यासाठी बँकेला रिझर्व बँक ऑफ इंडियाने मोबाईल बँकिंग सुविधा परवाना दिला आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जिल्ह्यातील२,३०,४०९ शेतकऱ्यांना रूपे क्रेडिट कार्डचे वितरण करून १५९१.३१ कोटींचे पीककर्ज वाटप केले आहे. तसेच बँकेच्या इतर ग्राहकांना रूपे क्रेडिट कार्डचे वितरण केलेले आहे . यासाठी बँकेने २६ एटीएम व एक मोबाईल व्हॅन मार्फत सदर कार्डच्या माध्यमातून रक्कम काढणे अथवा भरण्याची सुविधाही दिलेली आहे. तसेच शासकीय योजनांच्या पात्र रकमा लाभार्थ्यांच्या खात्यावर DBTL, PFMS द्वारे वर्ग करणे PoS, E-com, NEFT/RTGS, CTS,Clearing, SMS Alert इत्यादी सुविधाही उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
सद्यस्थितीत बँकेच्या सर्व ग्राहकांना घरातूनच कोविड -१९ या संसर्गाचा सामना अधिक प्रभावीपणे करता यावा म्हणून बँकेने KDCC MOBILE BANK हे मोबाईल ॲप तयार केलेले आहे. या ॲपद्वारे जिल्ह्यातील आठ लाखांपेक्षा अधिक ग्राहकांना शाखेत न येता डिजिटल व्यवहार करता येणार आहेत. या सुविधेद्वारे खात्यातील शिल्लक रक्कम तपासणे, खाते उतारा पाहणे, चेकबुक मागणी, मुदतबंद व रिकरिंग ठेव खाते उघडणे, बँकेतर्गत इतर खात्यामध्ये रक्कम वर्ग करणे इत्यादी व्यवहार करता येणार आहेत. तसेच NEFT व IMPS या सुविधांद्वारे इतर बँकांच्या ग्राहकांच्या खात्यावर सुद्धा रक्कम वर्ग करता येणार आहे. तसेच भविष्यामध्ये UPI व Bharat Bill Payment System याद्वारे मोबाईल फोन, विज बिल, पाणी बिल, मोबाईल व डिश टिव्ही रिचार्ज रक्कमा अदा करणे इत्यादी व्यवहार करता येणार आहेत. जिल्ह्यातील ग्राहक, नोकरदार व इतर घटकांना या सुविधांचा मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे. ही सेवा जिल्हा बँकेच्या केंद्र कार्यालयासह सर्वच १९१ शाखांमधून मिळणार आहे.
डिजिटल बँकिंगच्या पुढच्या टप्प्यात जिल्हा बँक ५०० मायक्रो एटीएम व दोन ई- लॉबी उभी करणार आहे. अद्ययावत तंत्रज्ञानाचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत मिळावा म्हणून गावपातळीवर मायक्रो एटीएम उपलब्ध करून देणार आहे . ही एक बँकेची छोटी शाखा म्हणूनच सेवा देणार आहे. त्यामुळे गावातील खातेदारांना विशेषता दूध उत्पादक, बचत गटातील महिला, शेतकरी वर्ग, शिक्षक, व्यापारी, व्यावसायिक व उद्योजक इत्यादींना सदर मायक्रो एटीएम द्वारे व्यवसाय प्रतिनिधी मार्फत गावातच रोख रक्कम उपलब्ध होणार आहे. तसेच त्यांना तिथेच आपल्या खात्यावर रक्कम भरता येणार आहे . मायक्रो एटीएमद्वारे खाते उघडण्याचा फॉर्मही भरता येणार आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या ग्राहकांचा शाखेत येण्या-जाण्याचा वेळ व खर्चही वाचणार असून, त्यांना तात्काळ विनामूल्य सेवा मिळणार आहे. तसेच जिल्ह्यात दोन ठिकाणी ई-लॉबी सुरू करणार आहे , या सुविधेमुळे ग्राहकांना शाखेत न जाता त्या ठिकाणी रक्कम काढणे व भरणे याशिवाय KIOSK मशिनद्वारे पासबुक प्रिंट करून घेणे इत्यादी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत .
कोविड -१९ या संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सामाजिक अंतर , मास्कचा वापर व सॅनिटायझरचा वापर या कार्यक्रमावेळी केला जाणार आहे.